अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा; डॉ.भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

महेंद्र महाजन
Tuesday, 29 September 2020

शेतातील उभी पिके पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या पिकांसह शेत वाहून गेले आहे. शिवाय नुकसानीचे पंचनामे होत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या, असे डॉ. पवार यांनी म्हटले आहे. 

नाशिक : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले आहे. 

नुकसानीचा आढावा घेतला

संसदेचे अधिवेशन आटोपून परतताच भ्रमणध्वनीवरून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नुकसानीचा डॉ. पवार यांनी आढावा घेतला. पुरामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांची घरे तसेच रस्ते पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहेत. शेतातील उभी पिके पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या पिकांसह शेत वाहून गेले आहे. शिवाय नुकसानीचे पंचनामे होत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या, असे डॉ. पवार यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

तत्काळ सरसकट नुकसानभरपाई

अगोदरच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जीवनमान विस्कळित झाले असताना निसर्गाने अवकृपा केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट नुकसानभरपाई मिळावी असे खासदार डॉ भारती पवार म्हणाल्या.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
 

संपादन - रो्हित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: declare drought in nashik district demand by bharti pawar nashik marathi news