ऊस लागवडीत घट! जिल्ह्यात पाच वर्षांत लागवड निम्म्यावर; कृषी विभागाची माहिती

us.jpg
us.jpg

नाशिक : जिल्ह्यात साखर उद्योगाची मोठी भरभराट होती. मात्र सहकाराचा स्वाहाकार झाल्यानंतर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. परिणामी पाच वर्षांत ऊस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याचे कृषी विभागाच्या माहितीनुसार समोर आले आहे. जरी लागवडी कमी झाली असली तरीही जिल्ह्यातील चार सहकारी व एक खासगी साखर कारखाना बंद असल्याने गाळपाचा पेच कायम आहे. 

साखर कारखाने बंदचा फटका 

जिल्ह्यात ऊस लागवडीत प्रामुख्याने निफाड तालुका आघाडीवर आहे. मात्र तालुक्यातील निफाड व रानवड सहकारी साखर कारखान्यांची धुराडी काही वर्षांपासून पेटलेली नाहीत. हीच परिस्थिती नाशिक व मालेगाव तालुक्यांची आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील ऊस उत्पादकांचे गाळपासाठी असलेले अवलंबित्व नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहता व संगमनेर तालुक्यांतील कारखान्यांवर आहे. मात्र या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध असल्याने हे कारखाने किती ऊस नेतात, हे पाहणे अपेक्षित असणार आहे. 
जिल्ह्यात सहकारी तत्त्वावरील कादवा साखर करखाना सुरू आहे. वसाका सुरू असला तरी तो भाडेकरू संस्थेकडे आहे. 

गाळपाची जिल्ह्यात सोय नसल्याने परावलंबित्व

रावळगाव व द्वारकाधीश असे अजून दोन कारखाने सुरू आहेत. तरीही क्षमतेचा विचार केल्यास गाळप होण्यास काही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे गाळपासाठी पुन्हा शेजारील जिल्ह्यातील कारखान्यांवर अवलंबून राहण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात उसाला पर्यायी पीक नसल्याने दिंडोरी, येवला, कळवण, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव तालुक्यांत विशिष्ट भागांमध्ये लागवडी कायम आहेच. मात्र आता अनेकांनी लागवडी कमी केल्या आहेत. पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्येही दिवसेंदिवस उसाचे क्षेत्र वाढत आहे. गाळपाची जिल्ह्यात सोय नसल्याने परावलंबित्व कमी झालेले नाही. 

जिल्ह्यातील ऊस लागवडीची स्थिती : (हेक्टर) 

ऊसलागवड...२०१५-१६...२०१६-१७...२०१७-१८...२०१८-१९...२०१९-२०...२०२०-२१ 

आडसाली...२४२५...४२१४...४५३३...४४६८...४३७९...४९८७ 

पूर्वहंगामी...१२२७...१६२४...३३५६...१८१८...१६७३...११२ 

सुरू...५४६...९२३...१५४३...१५४३...१५०८...३२८२...० 

खोडवा...२०१४...३५७८...५९१३...५८४८...५१२९...३४४३ 

एकूण...६२१२...१०३३९...१५३४५...१३६४३...१४३६५...८५१३ 

प्रमुख अडचणीचे मुद्दे 

-जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखाने बंद 
- जिल्ह्यात या वर्षी रसवंतीला ऊस न गेल्याने ऊस पडून 
- शेजारील जिल्ह्यातील कारखाने गरजेपुरता ऊसतोड करतात, मात्र लक्ष्यांक पूर्ण झाले, की तोड अर्धवट ठेवतात, अशी शेतकऱ्यांची तक्रार 
- ऊसतोडणीसाठी स्वतः खर्च व मजुराची शोधाशोध करावी लागत असल्याने अडचणीचे कामकाज 

जिल्ह्यातील साखर कारखाने बंद असल्यामुळे गाळप होईल की नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये असल्याने ऊस लागवड घटल्याची स्थिती आहे. त्यामुळे आकडेवारी कमी झाली. मात्र कादवा कारखान्याने गाळप क्षमता वाढविली आहे. यांसह इतर कारखाने सुरू झाल्याने आगामी लागवड ही निश्‍चितच अधिकची असेल. - श्रीराम शेटे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ 

पहिल्यांदा तीस एकरापर्यंत ऊस लागवड करायचो. मात्र, स्थानिक कारखाने बंद असल्याने गाळप करण्याचा प्रश्न निर्माण झाला, तो आजही कायम आहे. निफाड तालुक्यातील कारखाने या हंगामात सुरू होतील, अशी आशा होती. मात्र अजून काही थेट कार्यवाही दिसत नाही. शेजारचे कारखाने ऊस नेतात मात्र अडून पाहतात. - बाबूराव सानप, ऊस उत्पादक व उपाध्यक्ष, रानवड साखर कारखाना बचाव कृती समिती  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com