esakal | "रुग्णालयाची पायरी नको रे बाबा..!" असं का म्हणतायत नागरिक?
sakal

बोलून बातमी शोधा

nashik hospital.jpg

24 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला होते. लॉकडाउनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थोपवला जावा हा प्रमुख उद्देश असला तरीही राज्यात व जिल्ह्यात विशेषत: मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच होता. सर्वच व्यवहार बंद असताना तिकडे जिल्हा रुग्णालयातील ओपीडीतील रुग्णसंख्याही रोडावली होती

"रुग्णालयाची पायरी नको रे बाबा..!" असं का म्हणतायत नागरिक?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 22 मार्चला जनता संचारबंदी, त्यानंतर 24 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला होते. लॉकडाउनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थोपवला जावा हा प्रमुख उद्देश असला तरीही राज्यात व जिल्ह्यात विशेषत: मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच होता. सर्वच व्यवहार बंद असताना तिकडे जिल्हा रुग्णालयातील ओपीडीतील रुग्णसंख्याही रोडावली होती. कोरोनाच्या भीतीने रुग्ण ओपीडीत येत नसल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच लॉकडाउन असल्याने वाहतूक व्यवस्थेअभावी जिल्हाभरातील रुग्णांना ओपीडीसाठी येण्यास अडचणी आल्याने रुग्णसंख्येत घट झाली होती. 

सिव्हिलच्या ओपीडीतील घटली रुग्णसंख्या  

जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी म्हणजेच ओपीडीतील रुग्णांची संख्या एप्रिल, मेमध्ये घसरली आहे. मार्चमध्ये बाह्यरुग्ण तपासणीत तब्बल 21 हजार 169 रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी केली होती. तीच संख्या एप्रिल व मेमध्ये अनुक्रमे सात हजार 569 व नऊ हजार 993 वर आली आहे. लॉकडाउनमुळे जिल्हाभरातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात येणे शक्‍य झाले नाही, तर दुसरीकडे अनेकांनी कोरोनाच्या भीतीनेही रुग्णालयाची पायरी चढणे टाळल्याचे यातून दिसून येत आहे. 

ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये घट 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, गर्दीचे ठिकाण टाळणे, साबण-पाण्याने वेळोवेळी हात धुणे आदींचा त्यात समावेश आहे. तसेच सर्दी, खोकला होऊ नये म्हणून घरगुती पद्धतीने काढा घेणे, गरम पाणी पिणे आदीही उपाययोजना करण्यात आल्या होत्या. कधी नव्हे ती आरोग्याची एवढी काळजी घेतली जात असल्याने काही वातावरण संक्रमणाच्या काळात ताप, सर्दी, खोकल्याची साथ कमी झाल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मधुमेह, ब्लडप्रेशर तसेच इतर जुने आजार असलेल्या रुग्णांचीच संख्या ओपीडीमध्ये सर्वाधिक होती. 

लॉकडाउनचा परिणाम : कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णालयाची पायरी नको 

हेही वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

महिना बाह्यरुग्णांची संख्या आंतररुग्णांची संख्या ऍडमिट 

जानेवारी 23,577 6,747 
फेब्रुवारी 24,567 5,678 
मार्च 21,169 4,418 
एप्रिल 7,569 2,417 
मे 9,993 2,837 

हेही वाचा >  नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना
 
कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णाची संख्या दळणवळणाअभावी कमी झाली होती. तसेच कोरोनाची साथ सुरू असताना जिल्हा सामान्य रुग्णालयात जाणे अनेकांनी टाळले होते. सर्दी, खोकला होऊ नये म्हणून नागरिकांकडून आधीच घरगुती उपाययोजना केल्या जात होत्या. -डॉ. विवेक जेजूरकर, प्रभारी अतिरिक्‍त जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक