नाशिकचे पो.आयुक्त दिपक पांडे म्हणतात; "मराठा मोर्चाला नोटीस बजावणार नाही, पण...

प्रमोद दंडगव्हाळ
Monday, 14 September 2020

रविवारी नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या प्रातिनिधीक बैठकीत झालेल्या ठरावानंतर शहराची कायदा सुव्यवस्था ढासळेल असे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाकडून होऊ नये यासाठी शहर पोलीस सजग झाले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून काही समन्वयकांना शहर पोलीसांनी  कलम १४९ अन्वये इशारा वजा नोटीस दिली होती. या नोटीसमुळे शांततेत आंदोलनाची भुमिका असलेल्या मराठा क्रांती मोर्चात रोष वाढू लागला होता.

नाशिक : नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्ता समन्वयकांना शहर पोलीसांकडून नाहक ञास देण्याच्या हेतूने कलम १४९ अन्वये नोटीस बजावली जाणार नाही, तथापी संभाव्य आंदोलनात सार्वजनिक शांतता भंग होऊन सामान्य जनजीवन प्रभावीत होणार नाही याची खबरदारी क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांनी घ्यावी असे आवाहन नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे.

मराठा मोर्चाला नोटीस बजावणार नाही - दीपक पांडे

रविवारी नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या प्रातिनिधीक बैठकीत झालेल्या ठरावानंतर शहराची कायदा सुव्यवस्था ढासळेल असे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाकडून होऊ नये यासाठी शहर पोलीस सजग झाले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून काही समन्वयकांना शहर पोलीसांनी  कलम १४९ अन्वये इशारा वजा नोटीस दिली होती. या नोटीसमुळे शांततेत आंदोलनाची भुमिका असलेल्या मराठा क्रांती मोर्चात रोष वाढू लागला होता. राज्यस्तरीय माध्यमांसह सोशल मिडीयावरही ब्रेकींग झळकू लागल्याने मराठा समन्वयकांमध्ये रोष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.

कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मात्र आंदोलकांची..

या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आणि मराठा क्रांती मोर्चात अनेक आंदोलनात दिसलेला समन्वय भविष्यात धोक्यात येऊ नये,निर्दोष मराठा तरूणांवर नाहक गुन्हे दाखल होऊन त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ नये या हेतूने मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर. राजू देसले तुषार जगताप,गणेश कदम आशिष हिरे आदी जबाबदार समन्वयकांसोबत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलीस आयुक्तालयात चर्चा करून क्रांती मोर्चाची भुमिका समजून घेतली.सर्व समन्वयकांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या परांपरेला धक्का लागणारी कुठलीही भुमिका जबाबदार समन्वयक म्हणून आम्ही घेणार नाही.उलट कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी मराठा तरूणांनी पुढाकार घेतला,समाज जीवन प्रभावीत होणार नाही.

मराठा क्रांती मोर्चाच्या भुमिकेवर समाधान

हाच मराठा आंदोलनाचा मुख्य अजेंडा असल्याची भुमिका उपस्थित समन्वयकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.या बैठकीत झालेल्या चर्चेतील मराठा क्रांती मोर्चाच्या भुमिकेवर पोलीस आयुक्त दीपक पांडे  यांनी समाधान व्यक्त करून शहर पोलीस आकस किंवा पुर्वग्रहाने कारवाई करणार नाही असे आश्वासन समन्वयकांना दिले. या बैठकीला पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील,अमोल तांबे,एसआयडीच्या पो.नि.स्वाती कुराडे यांनीही मौल्यवान सुचना केल्या.

 

मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या लाखोंच्या मोर्चातही कायदा सुव्यवस्था अबाधीत राहीली.छञपतींच्या आदर्श मार्गावर वाटचाल करणारा हा समाज रयतेला वेठीस धरू शकत नाही.माञ कायदा किंवा समाज विघातक शक्तींनी समाजाला डिवचू नये. सकल मराठा समाजाच्या वतीने येणाऱ्या काळात जी आंदोलने दिली जातील तीच आंदोलने समाजातील तरुणांनी समाज बांधवांनी करावी मराठा क्रांती मोर्चा हा एकसंघ आहे त्यामुळे वैयक्तिक आंदोलन करण्याची भूमिका कोणीही घेऊ नये ही विनंती करतो-  करण गायकर

मराठा समाज समंजस आहे,हे गेल्या दोन पाच वर्षात झालेल्या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे.कायदा सुव्यवस्था ढासळेल असे कृत्य स्वतःहून कुठल्याही आंदोलनात होणार नाही.- .राजू देसले

मराठा समाज आक्रमक झाला तरी विध्वसंक कधीच झाला नाही भविष्यातही होणार नाही.छञपतींचा महाराष्ट्र आहे.या महाराष्ट्राला मान खाली घालावी लागेल असे कृत्य कुठल्याच आंदोलनात होणार नाही.नाशिकवर अधिक जबाबदारी असल्याने ती खबरदारी आम्ही घेणार आहोतच.माञ दुसऱ्या बाजूला मराठा समाजाविषयी पुर्वग्रह बाळगून या आंदोलनाच्या भावना भडकावण्यासाठी  काही विध्वंसक प्रवृत्ती सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह आहेत.त्या प्रवृत्तींनाही पोलीस यंत्रणेने समज द्यावी. -तुषार जगताप,

रविवारच्या समाज बैठकीत आम्ही हातात बाँब घेऊ अशी प्रतिक्रीया दिली गेली असली तरी ती केवळ प्रतिक्रीया होती.व्यवस्थेवर चिड व्यक्त करणारी   प्रातिनिधीक प्रतिक्रीया होती.बाँब खेळणारे नक्षलवादी नाही.छञपतींनी आम्हाला वैधानिक संघर्ष शिकवला आहे,त्याच मार्गावर आम्ही लोकशाही पध्दतीने आमचे हक्क पदरात पाडून घेऊच.फक्त आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका हीच विनंती आहे.-गणेश कदम

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepak pandey said about maratha morcha notice nashik marathi news