esakal | धक्कादायक! हरणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे शिकार; ग्रामस्थांकडून संताप..काय घडले नेमके?
sakal

बोलून बातमी शोधा

Kalwit Shikar

निसर्गसौंदर्याने नटलेल्या या भागात सुमारे दहा हजार हेक्टर जमीन असून, यात पाच हजारांच्या आसपास हरणांचा वावर आहे. हरणांकडून शेतीचे नुकसान होत असूनही परिसरातील अनेक शेतकरी हरणांचे लाड पुरवतात. किंबहुना शेतकरीच या हरणांच्या सुरक्षेची काळजी घेतात. असे असताना काही समाजकंटक या हरणांच्या जिवावर उठत असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.अशीच एक घटना डोंगरगावात घडली आहे. ​

धक्कादायक! हरणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे शिकार; ग्रामस्थांकडून संताप..काय घडले नेमके?

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक / येवला : निसर्गसौंदर्याने नटलेल्या या भागात सुमारे दहा हजार हेक्टर जमीन असून, यात पाच हजारांच्या आसपास हरणांचा वावर आहे. हरणांकडून शेतीचे नुकसान होत असूनही परिसरातील अनेक शेतकरी हरणांचे लाड पुरवतात. किंबहुना शेतकरीच या हरणांच्या सुरक्षेची काळजी घेतात. असे असताना काही समाजकंटक या हरणांच्या जिवावर उठत असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.अशीच एक घटना डोंगरगावात घडली आहे. 

काय घडले नेमके?

अधूनमधून रात्रीच्या वेळी येथे शिकार होत असल्याच्या चर्चेलाही ग्रामस्थ दुजोरा देतात. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास वन विभागाने शिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. डोंगरगाव येथे एका खासगी शेतीमध्ये काही जण हरणांची शिकार करणार असल्याची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला असता, एका शेतात जाळीच्या सहाय्याने हरणाला पकडून त्याच्या डोक्यामध्ये दगड टाकून निर्घृणपणे शिकार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वन विभागाच्या पथकाने मधुकर शिवाजी पवार (रा. बिलवणी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) याला मृत काळविटासह अटक केली आहे. त्याचे पाच साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. भंडारी यांच्यासह वनपाल एम. बी. पवार, वनरक्षक प्रसाद पाटील, गोपाळ हरगावकर, वनसेवक विलास देशमुख आदींनी ही कारवाई केली. त्यांना उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे यांचे मार्गदर्शन लाभले.

साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी

डोंगरगाव (ता. येवला) येथे हरणाची शिकार करणाऱ्या संशयितास वन विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. ११) दुपारी राजापूर-ममदापूर वनहद्दीत मृत हरणासह पकडले. त्याचे चार ते पाच साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. यापूर्वी रेंडाळे येथील ग्रामस्थांनी २००९ मध्ये मालेगाव येथील एका टोळीला बंदुकीसह शिकार करताना रंगेहाथ पकडून दिले होते.

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा


रेंडाळे येथील जखमी काळविटाचा मृत्यू
नगरसूल : रेंडाळे (ता. येवला) येथील ममदापूर-रेंडाळे रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत सोमवारी (ता. १०) घडलेल्या कथित शिकारीच्या घटनेतील काळविटाचा मंगळवारी (ता. ११) उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी रस्त्याच्या कडेला धडपडत चालताना आढळलेल्या या काळविटाच्या मानेवर गोळी लगल्यागत गोल जखम व रक्तस्राव दिसून आला होता. प्रत्यक्षदर्शीनी तेथून एक इंडिका कारदेखील जोरात गेल्याचे सांगितले होते. यावरून काळविटाच्या शिकारीचा प्रयत्न झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर काळविटास येवला येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, दोन काळविटांच्या झुंजित शिंग लागल्यामुळे काळवीट जखमी होऊन रक्तस्राव झाल्याची माहिती पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार वन विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा >  थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

संपादन : ब्रिजकुमार परिहार

go to top