
सध्या ओझर विमानतळावरून अहमदाबाद, पुणे व हैद्राबाद सेवा नियमित सुरु आहे. नाशिक मधून राजधानी दिल्ली शहराला जोडणारी हवाई सेवा सुरु करण्याची उद्योजकांची मागणी होती.
नाशिक : लॉकडाऊन मुळे बंद पडलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरु होणार असून त्याचबरोबर हैद्राबाद शहरात पोहोचण्यासाठी आणखी एक विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून स्पाईस जेट कंपनी वीस नोव्हेंबर पासून सेवा सुरु करणार असल्याचे आज कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले.
नाशिक मधून दिल्ली, हैद्राबाद विमान सेवा
उडान-२ योजनेंतर्गत नाशिक मधून पुणे, अहमदाबाद व हैद्राबाद या शहरांमध्ये पोहोचण्यासाठी विमानसेवा सुरु आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅण्डींग साठी स्लॉट उपलब्ध होत नसल्याने अनेकदा सुरु झालेली मुंबई विमानसेवा बंद करण्यात आली आहे. पुणे येथील लष्कराचे विमानतळ वापरले जात आहे. संरक्षण विभागाकडून परवानगी मिळतं नसल्याने मध्यंतरी सेवा बंद करण्यात आली होती. परंतू संरक्षण विभागाने पुन्हा हिरवा कंदील दाखविल्यानंतर सेवा सुरु झाली. सध्या ओझर विमानतळावरून अहमदाबाद, पुणे व हैद्राबाद सेवा नियमित सुरु आहे. नाशिक मधून राजधानी दिल्ली शहराला जोडणारी हवाई सेवा सुरु करण्याची उद्योजकांची मागणी होती. खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केल्यानंतर हवाई वाहतुक मंत्रालयाने परवानगी दिली त्यानुसार स्पाईस जेट विमान कंपनीकडून नाशिक मधून दिल्ली सह हैद्राबाद अशी विमान सेवा सुरु होणार आहे.
हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ
व्यवसायाला चालना मिळणार
या निर्णयामुळे नाशिक देशातील मेट्रो शहरांशी जोडले जाणार आहे. हैद्राबाद मध्ये माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्या मोठ्या असल्याने त्याचा फायदा उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यात होणार आहे. देशांतर्गत सेवा वाढल्यानंतर ओझर येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त होण्यास मदत होणार आहे. यापुर्वी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय कुरिअर हब मध्ये ओझर विमानतळाचा समावेश केला आहे.
दिल्ली, हैद्राबाद विमानसेवेमुळे नाशिक मधील उद्योग, व्यापाराला चालना मिळेल. नाशिक राजधानी दिल्लीसह हैद्राबाद या मेट्रो शहराशी कनेक्ट होईल. भविष्यात चेन्नई, बेंगलुरु या शहरांना जोडणारी हवाई सेवा सुरु करण्याचे प्रयत्न आहे.- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक.
हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा
अशी असेल हवाई सेवा
स्पाईस जेटचे विमान दिल्लीहून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी उड्डाण करेल. ओझर विमातळावर पाच वाजता पोहोचेल. ओझर वरून पाच वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीकडे उड्डाण होईल. दिल्लीला संध्याकाळी साडे सात वाजता पोहोचेल. हैद्राबाद येथून सकाळी साडे दहा वाजता उड्डाण होईल. ओझर विमानतळावर दुपारी बारा वाजून पाच वाजता पोहोचेल. साडे बारा वाजता पुन्हा उड्डाण होईल. हैद्राबाद येथे दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. आठवड्यातून चार दिवस सेवा राहील.