महापालिकेच्या ऑनलाईन तक्रारींचा खोळंबा; मात्र कोरोनाचे कारण देत अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच

nmc.jpg
nmc.jpg

नाशिक : नागरिकांच्या तक्रारींचे परिणामकारक निवारण करण्यासाठी महापालिकेने विकसित केलेल्या एनएमसी ई-कनेक्ट ॲपवर नागरिकांकडून तक्रारी करून त्याची दखल घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता व संपुर्ण यंत्रणाच कोव्हिडचा सामना करण्यात लागल्याने त्याचा परिणाम म्हणून नागरिकांच्या तक्रारी ॲपवर पडून आहे. 

ॲपवर तक्रारींची चोविस तासात दखल घेणे बंधनकारक

महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी व घरबसल्या तक्रार करता यावी म्हणून स्मार्ट नाशिक ॲप विकसित केले. ॲपवरील तक्रारींची चोविस तासात दखल घेणे बंधनकारक करताना दखल न घेतल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर सन २०१८ मध्ये माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यात बदल करत एनएमसी ई-कनेक्ट ॲपची निर्मिती केली होती. सात दिवसांत तक्रारींचे निवारण, तक्रारीचे निवारण न झाल्यास पुन्हा ट्रॅकवर, तक्रारींचे निवारण वेबसाइटवर या सुविधा देताना नागरिकांना फीडबॅक, रिओपन व रेटिंग देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 

दुर्लक्ष केल्याची बाब समोर

प्रभागनिहाय तक्रारी देखील ॲपच्या माध्यमातून दिसण्याची सोय होती. ॲपवर घंटागाडीचा अलार्म मिळण्याची देखील सुविधा होती. परंतू अद्यापपर्यंत नागरिकांच्या मोबाईलवर घंटागाडीचा अलार्म कधी आला नाही. मार्च महिन्यात कोरोनाच्या शिरकावामुळे लॉकडाऊन प्रक्रिया सुरु झाली. याच काळात सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये तीस टक्के कर्मचारी हजेरी बंधनकारक करण्यात आली होती. एप्रिल महिन्यापासून नाशिककरांकडून ॲपवर मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या. परंतू सात दिवसात तक्रारींचा निपटारा बंधनकारक असताना अधिकारी, कर्मचारी वर्गाने दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. 

ऑनलाईन तक्रारींना फाटा 

सन २०१८ पासून एनएमसी ई-कनेक्ट ॲपवर ९५ हजार ३४९ तक्रारी दाखल झाल्या. त्यातील ९४ हजार ३६८ तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आला. तक्रारींच्या निवारणाचे प्रमाण ९८ टक्के असल्याचे सांगितले जात असले तरी एप्रिल महिन्यापासून ॲपवर २७०० हून अधिक तक्रारी प्रलंबित आहे. त्या तक्रारींचे निराकरण होत नाही. अधिकाऱ्यांकडून कर्मचारी वर्ग नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे कोरोनाचे निमित्त साधून ऑनलाईन तक्रारींना अधिकारी वर्गाकडून फाटा देण्यात आल्याचे दिसत आहे. 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com