वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करा; पिंपळगावच्या बैठकीत आमदार बनकरांची अधिकाऱ्यांना तंबी 

दीपक अहिरे
Tuesday, 20 October 2020

गेल्या पंधरा दिवसांपासून पिंपळगाव शहर, रानमळा, बेंदमळा परिसरात विजेच्या लंपडाव सुरू होता. त्याविरोधात शेतकरी व नागरिक प्रचंड आक्रमक होऊन आज पिंपळगावच्या महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते.

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) द्राक्षछाटणी व बागेवर औषध फवारणीच्या काळात शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होत नाही. सहनशीलतेचा अंत झाल्याने शेतकऱ्यांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागला. येत्या चार दिवसांत वीजतारा, रोहित्र यांची तपासणी करून वीजपुरवठा सुरळीत करा, अशी तंबी आमदार दिलीप बनकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सोमवारी (ता. १९) दिली. 

अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये बैठक

गेल्या पंधरा दिवसांपासून पिंपळगाव शहर, रानमळा, बेंदमळा परिसरात विजेच्या लंपडाव सुरू होता. त्याविरोधात शेतकरी व नागरिक प्रचंड आक्रमक होऊन आज पिंपळगावच्या महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. आमदार बनकर यांनी याबाबत दखल घेत महावितरणचे अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये बैठक घडवून आणली. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे, पगार, मविप्रचे माजी संचालक विश्‍वास मोरे, दिलीप मोरे, बाळासाहेब बनकर उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी प्रश्‍नांची सरबत्तीच अधिकाऱ्यांवर केली. वीजपुरवठा कधीही खंडित केला जातो, रात्र अंधारात काढावी लागते, शेतीची कामे ठप्प आहेत, अशा एका पाठोपाठ एक समस्यांची मालिकाच शेतकऱ्यांनी उपस्थित केली. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

कडक शब्दांत समज

तक्रारीसाठी दूरध्वनी क्रमांकावरून प्रतिसाद मिळत नाही. वीज वितरणचे कर्मचारी संपर्क करूनही रोहित्रातील बिघाड दुरुस्तीसाठी येत नाही, अशा तक्रारींचा पाढा शेतकऱ्यांनी वाचला. यावर आमदार दिलीप बनकर यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत समज दिली. तसेच १५० अतिदाबाच्या रोहित्राचा प्रस्ताव मंत्रालयात सादर केला आहे. यांसह मतदारसंघात मुबलक प्रमाणात वीजपुरवठ्यासाठी ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठविल्याचे आमदार बनकर यांनी या वेळी सांगितले. महावितरणचे कापसे, पगारे यांनी शुक्रवार (ता. २३)पर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे आश्‍वासीत केले. स्व. बनकर पतसंस्थेत झालेल्या बैठकीस संजय मोरे, रवींद्र मोरे, गणेश बनकर, श्याम मोरे, राजेंद्र खोडे, सुनील जाधव, जयराम मोरे, दिलीप दिघे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

आमदार बनकरांच्या मध्यस्थीने टळला मोर्चा 

वीजपुरवठा खंडितवरून पिंपळगावच्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड खदखद होती. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आंदोलनाचा शॉक देण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली होती. पण आमदार दिलीप बनकर यांनी शेतकरी व वीज वितरणचे अधिकारी यांची सकाळी बैठक घेतली. त्यात मार्ग निघाल्याने मोर्चा टळला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Bankar demanded the officials to streamline the power supply nashik marathi news