esakal | मध्यरात्रीस खेळ चाले! रस्त्यावरच्या गायी अचानक होताएत गायब; महागड्या गाड्यांचा वापर 
sakal

बोलून बातमी शोधा

cows on road.jpg

मध्यरात्रीच्या वेळेस स्कॉर्पिओ, स्कोडासारख्या महागड्या गाड्यांतून रस्त्यावर फिरणाऱ्या गायींना गुंगीचे औषध देऊन तस्करी केली जात आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून या गाड्यांमध्ये भरून त्यांची तस्करी करायची, अशा घटना जिल्ह्यात वाढल्या आहेत.

मध्यरात्रीस खेळ चाले! रस्त्यावरच्या गायी अचानक होताएत गायब; महागड्या गाड्यांचा वापर 

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : मध्यरात्रीच्या वेळेस रस्त्यावर फिरणाऱ्या गायी अचानक गायब होत असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. अशा घटना जिल्ह्यात वाढल्या आहेत. शहरात गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून असे प्रकार होत आहेत. त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्याची मागणी आता गोप्रेमींकडून केली जात आहे. 

रस्त्यावर फिरणाऱ्या गायी अचानक गायब
येवला शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रस्त्यावर फिरणाऱ्या गायींची महागड्या गाड्यांमधून तस्करी होऊ लागल्या आहे. शनिवारी (ता. १७) पहाटे ब्रेडमधून गुंगीचे औषध देऊन येवला शहरात पुन्हा गायीची चोरी झाली. तर मागील आठवड्यात पिंपळगाव बसवंत येथेही अशीच घटना घडली आहे. शहरातील पारेगाव रोड भागातून मागील आठवड्यात गाय मध्यरात्री चोरीला गेली असून, आठवड्यातून एक-दोनदा अशा घटना घडत आहेत. मागील महिन्यात पहाटे पावणेदोनच्या सुमारास विंचूर रोडवर महागाड्या चारचाकीत दोन गायी चोरून नेल्या. स्थानिक गोरक्षकांना कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्याने त्यांचा संशय बळावला.

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

जिल्ह्यात टोळी सक्रिय; महागड्या गाड्यांचा वापर 

त्यामुळे संदीप पाबळे, सतीश पाबळे आदी गोरक्षक बाहेर आले असता, हा प्रकार दिसला. त्यांनी तत्काळ गोरक्षक चेतन लोणारी यांना फोन केला, तेही तातडीने त्या ठिकाणी गेले. सर्वजण जमल्याने गाडीत टाकलेल्या दोन गायी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या युवकांच्या जागृतीमुळे इतर सहा जनावरांना वाचविण्यात यश आले. स्कॉर्पिओ सिल्वर कलर व स्कोडा ब्लॅक या दोन गाड्यांचा पाठलाग या कार्यकर्त्यांनी केला तेव्हा ते नाशिकमार्गे पलायन करण्यात यशस्वी झाले. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

येवल्यात सर्वाधिक घटना 
या गायींना गुंगीचे औषध देऊन तस्करी केली जात आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून महागड्या गाड्यांमध्ये भरून त्यांची तस्करी केली जात आहे. शहरात अनेक मालकांनी सांभाळण्याचा त्रास नको म्हणून गायी मोकळ्या सोडल्या असून, या गायी महामार्गाच्या मधोमध कुठेही बसतात. शिवाय रात्रीच्या वेळेस कॉलनी भागात फिरून अनेक मोकळ्या जागेत बसून घाण करतात. यातील निम्म्यावर गायींना मालक असून, या गायी ते जाणीवपूर्वक मोकळ्या सोडत असल्याचीही चर्चा आहे. 

दोन वर्षांपासून तक्रारी 
यापूर्वी देखील अनेकदा गायी चोरीस गेल्या आहेत. या संदर्भात दोन वर्षांपूर्वी नगरसेवक रुपेश लोणारी यांनी तर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता. मध्यंतरी देशमाने येथे एका इंडिगोचे टायर फुटल्याने चोरटे गाडी सोडून फरारी झाले तेव्हा गाडीत दोन ते तीन कोंबलेल्या गायी आढळल्या होत्या. असे प्रकार वारंवार होत आहे. 

पिक-अपऐवजी महागड्या गाड्या 
जनावरांची वाहतूक करण्यासाठी खासकरून पिक-अप गाडीचा वापर केला जातो. मात्र या मालवाहतूक गाड्यांचा संशय येतो. त्यामुळे आता गायी चोरणाऱ्या चोरट्यांकडून इंडिगो, स्विफ्ट, स्कॉर्पिओ अशा गाड्यांचा वापर सर्रास होत आहे. 

शहरातील पाळलेले व भटके गोवंश चोरी जाण्याचे प्रकार वाढीला लागलेले आहे. गायींना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन चोरी केली जात आहे. येथे गायींची संख्या अधिक असल्याने रात्री चोरटे संधी साधतात. हा गंभीर प्रकार आहे. यावर कारवाई आवश्‍यक आहे. -चेतन लोणारी, सामाजिक कार्यकर्ते 

 

go to top