पदविका अभ्यासक्रमांच्‍या अर्जासाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ

अरुण मलाणी
Wednesday, 23 September 2020

तक्रार नोंदविण्यासाठी ४ ते ६ ऑक्‍टोबर दरम्‍यान मुदत दिली जाणार आहे. अंतीम गुणवत्ता यादी ८ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध करणार असल्‍याचे सध्याच्‍या वेळापत्रकात नमुद केले आहे. वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे आवाहन डीटीईतर्फे केले आहे. 

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विविध शाखांतील पदविका अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत पुन्‍हा एकदा वाढविली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे मुदतवाढ करत असल्‍याची सूचना जारी केली असून, त्‍यानुसार आता इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना बुधवार (ता.३०) पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. पॉलीटेक्‍नीक, डी. फार्म., हॉटेल मॅनेजमेंटसह अन्‍य अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी इच्‍छुक विद्यार्थ्यांना या मुदतवाढीचा लाभ होईल. 

पॉलीटेक्‍नीक, डी.फार्मसह अन्‍य अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी 

इयत्ता दहावीनंतर पॉलीटेक्‍नीकमध्ये डिप्‍लोमा अभ्यासक्रमास प्रवेशासाठी ही मुदतवाढ असणार आहे. तसेच इयत्ता बारावीनंतर औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील डी. फार्म. या पदविका अभ्यासक्रमासाठी, तसेच हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरींग टेक्‍नॉलॉजी, सर्फेस कोटींग टेक्‍नॉलॉजी या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठीदेखील ही वाढीव मुदत असणार आहे. दरम्‍यान या प्रवेश प्रक्रियेदरम्‍यान कॅप व्‍यतिरिक्‍त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्‍चिती करण्याची प्रक्रिया प्रवेशाच्‍या अंतीम तारखेपर्यंत सुरू राहाणार आहे. ३० सप्‍टेंबरनंतर ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी पद्धतीद्वारे नोंद होणारे, पडताळणी व निश्‍चित होणारे अर्ज संस्‍था स्‍तरावरील व कॅपव्‍यतिरिक्‍त जागांसाठीच विचारात घेतले जातील, असे तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे स्‍पष्ट केले आहे. 

तक्रार नोंदविण्यासाठी ४ ते ६ ऑक्‍टोबर दरम्‍यान मुदत

दरम्‍यान तात्‍पुरती गुणवत्ता यादी ३ ऑक्‍टोबरला जारी केली जाणार आहे. तर या यादीसंदर्भात विद्यार्थ्यांना काही हरकत, तक्रार नोंदविण्यासाठी ४ ते ६ ऑक्‍टोबर दरम्‍यान मुदत दिली जाणार आहे. अंतीम गुणवत्ता यादी ८ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध करणार असल्‍याचे सध्याच्‍या वेळापत्रकात नमुद केले आहे. वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे आवाहन डीटीईतर्फे केले आहे. 

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

थेट द्वितीय वर्ष पदविकेच्‍या प्रवेश अर्जाला मुदतवाढ 

थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रियादेखील सुरू आहे. याअंतर्गत पात्र उमेदवारांना ऑनलाइन स्‍वरूपात अर्ज दाखल करण्यासाठी १ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत वाढविली आहे. या प्रक्रियेअंतर्गत विहीत मुदतीत विद्यार्थ्यांना अर्ज निश्‍चिती व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ५ ऑक्‍टोबरला तात्‍पुरती गुणवत्ता यादी जारी केली जाईल. हरकती नोंदविण्यासाठी ६ ते ८ ऑक्‍टोबरची मुदत असेल. तर १० ऑक्‍टोबरला अंतीम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Of diploma courses Extension till Wednesday for application nashik marathi news