लॉकडाउनमुळे विभागीय कार्यालयातील कामकाजही ठप्प! २ महिन्यांत केवळ ४ जन्म दाखल्यांचे वितरण

युनूस शेख 
Sunday, 24 January 2021

कोरोनामुळे पूर्व विभागीय कार्यालयात दोन महिन्यांत केवळ चार दाखल्यांचे वितरण झाले. एप्रिल आणि मेमध्ये अशी परिस्थिती होती. वर्षभराचा विचार केल्यास सुमारे दहा हजार ८८९ जन्म, तर पाच हजार ६४० मृत्यूचे दाखले वितरित करण्यात आले. 

जुने नाशिक : कोरोनामुळे पूर्व विभागीय कार्यालयात दोन महिन्यांत केवळ चार दाखल्यांचे वितरण झाले. एप्रिल आणि मेमध्ये अशी परिस्थिती होती. वर्षभराचा विचार केल्यास सुमारे दहा हजार ८८९ जन्म, तर पाच हजार ६४० मृत्यूचे दाखले वितरित करण्यात आले. 

देशांसह शहरात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाल्याने केंद्र व राज्य सरकारतर्फे लॉकडाउन लावण्यात आला होता. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासह प्रत्येक कामावर त्याचा परिणाम झाला. शासकीय कार्यालयदेखील बंद होते. त्यामुळे अनेक शासकीय कामे होऊ शकली नाहीत. महापालिका विभागीय कार्यालयातील कामकाजही ठप्प होते. त्यामुळे जन्म-मृत्यूची नोंद किंवा दाखले वितरित होऊ शकले नाहीत.

वर्षभरात मृत्यूपेक्षा जन्म दाखल्याची दुप्पट नोंदणी

पूर्व विभागीय कार्यालयाचा विचार केला, तर एप्रिलमध्ये एक आणि मेमध्ये तीन असा दोन महिन्यांत केवळ चार जन्म दाखले नोंदणी होऊन वितरित झाले. या महिन्यात मृत्यू दाखले नोंदणी आणि वितरणाचे प्रमाण मात्र जास्त होते. अनुक्रमे ७८ आणि १४७ मृत्यू दाखल्यांचे वितरण झाले. जूनमध्येही केवळ ३४ जन्म दाखल्यांचे वितरण झाले. जुलैपासून मात्र जन्म दाखले नोंदणी आणि वितरणात वाढ होत गेली. त्याचप्रमाणे मृत्यू दाखल्यांमध्येही वाढ झाली. एप्रिल आणि मे सोडला तर मार्च ते ऑक्टोबर दरम्यान पूर्व विभागीय कार्यालयातील दाखले वितरणाचे प्रमाण चांगले होते. या महिन्यात जन्माचे पाच हजार २९२ दाखले, तर मृत्यूचे तीन हजार १८२ दाखल्यांची नोंदणी होऊन वितरित झाले. त्याचप्रमाणे जानेवारी २०२० ते २४ जानेवारी २०२१ अशा वर्षभराच्या सुमारे दहा हजार ८८९ जन्म, तर पाच हजार ६४० मृत्यूचे दाखले वितरित झाले. कोरोना काळ आणि वर्षभराचा विचार केला, तर मृत्यूपेक्षा जन्म दाखल्याची दुप्पट नोंदणी आणि वितरणाचे प्रमाण होते. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

पूर्व विभागातील महिनानिहाय दाखल नोंदणी आणि वितरण 

महिना - जन्म - मृत्यू 
जानेवारी (२०२०) -  १ हजार ६५७ - ४८८ 
फेब्रुवारी - २ हजार १२७ -  ४९६ 
मार्च -  ३ हजार ७०-  ३५८ 
एप्रिल - ०१ -  ७८ 
मे - ०३ -  १४७ 
जून - ३४ - २७७ 
जुलै - ४०० - ४२४ 
ऑगस्ट - ५१७ - ४८० 
सप्टेंबर - ५८२ - ७०४ 
ऑक्टोबर - ६८८ - ७१४ 
नोव्हेंबर - ४९९ - ५०३ 
डिसेंबर - ८०६ - ५८३ 
जानेवारी (२०२१) - ५०५ - ३८८ 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of only 4 birth certificates in 2 months nashik marathi news