जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त; 3 महिन्‍यांत नीचांकी रुग्‍णवाढ

अरुण मलाणी
Sunday, 1 November 2020

एकीकडे नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या कमी होत असताना, दुसरीकडे कोरोनामुक्‍त झालेल्‍यांची संख्या या महिन्‍यात समाधानकारक राहिली. मृत्‍यूंचे प्रमाणही तुलनेत घटले. दरम्‍यान, जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ६७१ बाधित आढळून आले असून, यापैकी ८८ हजार सहा रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक : कोरोनाचा जिल्ह्यात फैलाव होत असताना सप्‍टेंबरमध्ये कोरोनाबाधित व मृत्‍यूंची उच्चांकी नोंद झाली होती. परंतु ऑक्‍टोबरमध्ये बहुतांश पाचशेपेक्षा कमी बाधित आढळून आले. तीन महिन्‍यांच्‍या तुलनेत ऑक्टोबरमध्ये नीचांकी रुग्‍णवाढ नोंदविली गेली. महिनाभरात ६५ हजार ६५० रुग्‍णांची स्‍वॅब चाचणी झाली असून, यापैकी १७ हजार ७९५ रुग्‍ण पॉझिटिव्‍ह आढळले. दरम्यान, २१ हजार ६१५ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली, तर तीनशे रुग्‍णांचा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्‍यू झाला. 

तीन महिन्‍यांत नीचांकी रुग्‍णवाढ 

शनिवारी (ता. ३१) दिवसभरात २२८ रुग्‍ण, तर ३६२ जणांनी कोरोनावर मात केली. तीन रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. जिल्‍हाभरात तीन महिन्‍यांत कोरोनाचा फैलाव तुलनेने वेगात झाला होता. जुलैपेक्षा ऑगस्‍ट, तर ऑगस्‍टपेक्षा सप्‍टेंबरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक राहिली. असे असताना ऑक्‍टोबर मात्र नाशिककरांसाठी दिलासादायक राहिला. एकीकडे नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या कमी होत असताना, दुसरीकडे कोरोनामुक्‍त झालेल्‍यांची संख्या या महिन्‍यात समाधानकारक राहिली. मृत्‍यूंचे प्रमाणही तुलनेत घटले. दरम्‍यान, जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ६७१ बाधित आढळून आले असून, यापैकी ८८ हजार सहा रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ६७० रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४९२, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४२, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात सात, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात चार, तर जिल्‍हा रुग्‍णालयात सहा रुग्‍ण दिवसभरात दाखल झाले. 

गेल्‍या महिन्‍यापेक्षा निम्‍मे ॲक्टिव्‍ह रुग्‍ण 

गेल्‍या महिनाअखेर ३० सप्‍टेंबरला जिल्ह्यात आठ हजार ११५ बाधितांवर उपचार सुरू होते. तर ऑक्‍टोबरअखेर शनिवारी उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या चार हजार १२० ने घटून चार हजारांच्‍या आत आली आहे. सद्यःस्‍थितीत तीन हजार ९९५ बाधितांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. 

महिनानिहाय स्‍थिती अशी 
महिना पॉझिटिव्‍ह बरे झालेले रुग्‍ण मृत्‍यू

जुलै १०,३०२ ८,७८७ २६१ 
ऑगस्‍ट २२,९७० १८,२९४ ३७३ 
सप्‍टेंबर ३८,४९० ३६,९७० ४९८ 
ऑक्‍टोबर १७,७९५ २१,६१५ ३०० 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

नामपूर येथील रुग्णाचा मृत्यू 

मालेगाव : नामपूर येथील ६२ वर्षांच्या रुग्णाचा महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत शहर व तालुक्यात नव्याने २२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, शहर व तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरात गृहविलगीकरणासह १३४ ॲक्टिव्ह रुग्णांवर, तर तालुक्यात ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबळींची संख्या तालुक्यात ६०, तर शहरात १६६ आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९३.०६ आहे. आज महापालिका रुग्णालयात नव्याने सात रुग्ण दाखल झाले.  

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: district has the highest corona patients cured in October nashik marathi news