"ॲडमिट नको, होम क्वारंटाइन व्हा!" नाशिकमध्ये दीड हजार रुग्ण कोरोनामुक्त होण्याबाबत डॉ. अतुल वडगावकरांची माहिती

dr vadgaonkar.jpg
dr vadgaonkar.jpg

नाशिक : कोरोनाला पराभूत करायचे, तर आधी कोरोनाची भीती दूर करावी लागेल. उपचार आणि वैद्यकीय सल्ल्याचे शंभर टक्के अनुकरण केले तर त्यावर शंभर टक्के विजय मिळवता येतो. त्यासाठी महागडे उपचार आणि रुग्णालयात ॲडमिट होऊन उपचार घेणे सक्तीचे नाही, हा संदेश शहरातील प्रत्येकापर्यंत जाण्याची गरज आहे. उपचाराची ही कार्यपद्धती अमलात आणून गेल्या दोन महिन्यांत डॉ. अतुल वडगावकर यांनी अत्यंत अल्प खर्चात दीड हजारांहून अधिक रुग्णांना बरे केले आहे. या यशकथेचे अनुकरण व प्रसार दोन्ही झाले तर कोरोनाचा पराभव अटळ आहे. तो दिवसदेखील फार दूर नाही. 

नाशिकमध्ये दीड हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त! 
शहरातील विजय नर्सिंग होमचे संचालक डॉ. विजय वडगावकर यांच्या रुग्णालयात त्यांनी केलेल्या या शैलीच्या उपचाराने त्यांच्याविषयी सांगणारे अनेक रुग्ण आहेत. त्यांची मोठी गर्दी होऊ लागल्याने अन्‌ रुग्णालयातील अन्य रुग्णांना कोरोनाबाधितांचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रुग्णालयासमोरील पार्किंगच्या जागेत तपासणी सुरू केली आहे. त्यांचे सर्व सहकारी अगदी बिनदिक्कत रुग्णांमध्ये वावरतात, त्यांना भेटतात. त्यांची माहिती घेतात. कोरोना नेमका होतो कसा, त्यावर उपचार काय, कोरोनाला पराभूत कसे करायचे, याची माहिती देतात. 

डर के आगे जीत है... 
सकाळी दहाला त्यांची ही ओपन क्‍लिनिक सुरू होते. दुपारपर्यंत ते रुग्णांची तपासणी करून गरजेच्या चाचण्या करतात. त्यानंतर औषधोपचार देऊन घरीच क्वारंटाइन व्हायला सांगतात. पुढील औषधोपचार, जीवनशैली, आहार यातूनच रुग्ण बरे होतात. १५ ऑगस्टनंतर त्यांना भेटायला व उपचारासाठी येणाऱ्या नियमित रुग्णांमध्ये कोरोनाची धास्ती असल्याचे त्यांना जाणवले. त्यातूनच त्यांनी कोरोना रुग्णांच्या मनातील भीती दूर करून उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण चालू देखील शकत नव्हते, ते त्यांच्या उपचारानंतर ठणठणीत झाले. कोरोनाला हरवल्याचा आत्मविश्‍वास त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसू लागला. अवघ्या काही दिवसांच्या उपचारानंतर असंख्य रुग्ण बरे झाले. त्यांनी या सर्व रुग्णांचे रेकॉर्ड व्यवस्थित जपून ठेवलेले आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू होऊन सहा महिने झालेत. समाज, प्रशासन, डॉक्‍टर आणि रुग्ण हे सर्व ‘कोरोना’ एवढेच कोरोनाच्या भीतीने ग्रस्त दिसतात. यावर डॉ. वडगावकर व त्यांचे सहकारी डॉ. कामिनी देवरे, डॉ. पूजा पाटील, मनीषा पळसेकर, मंगेश आरण यांनी लक्ष केंद्रित केले आहे. 

...असा ओळखा कोरोना संसर्ग ! 
कोरोनाची तीव्रता किती, यावर रुग्णाचे उपचार व तो बरे होण्याचा कालावधी निश्‍चित होतो. यामध्ये रुग्णाच्या फुफ्फुसाची ‘एचआरसीटी’ चाचणी केली जाते. त्यात फुप्फुस २५ भागात विभागून त्यातील किती भागाला ‘कोविड-१९’चा संसर्ग झाला, याचे १ ते २५ असे प्रमाण विचारात घेतले जाते. सामान्यतः सातपर्यंत संसर्ग असल्यास धोका अत्यंत कमी, हे प्रमाण ७ ते १४ असल्यास थोडा धोका आणि त्यापुढे धोकादायक स्थिती मानली जाते. फॅबीफ्ल्यू ४०० मिलिग्रॅम गोळी व अन्य औषधे कोरोनावर प्रभावी ठरत आहेत. काही केसेसमध्ये खासकरून ऑक्सिजनची पातळी ९० पेक्षा खाली गेल्यास रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपयोगी ठरते. मात्र ते देखील सरसकट गरजेचे नाही, असे कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

कोरोनाच्या खाटा रिक्त 
पूर्वी रुग्णांना दवाखान्यात खाटा मिळत नव्हत्या. त्यासाठी मोठी धावपळ करावी लागत होती. आता नागरिकांनाही कोरोनाविषयी वैद्यकीय माहिती, तीव्रता याची माहिती मिळत आहे. त्यातून कोरोनाची भीती कमी होऊ लागल्याने शहरातील कोरोनाचे केंद्र व अन्य दवाखान्यांतील रिक्त खाटांचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. यामध्ये डॉ. वडगावकर व त्यांच्यासारख्या अन्य डॉक्‍टरांचे परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. 

जीवनशैलीत शिस्त हवी 
सध्या सतत कोरोना विषयीच सगळ्या चर्चा होतात. नियमित औषधोपचार व जीवनशैलीतील शिस्त पाळल्याने कोरोनातून सहज मुक्त होता येते. रुग्णालयात दाखल न होता घरी राहून केलेले उपचारदेखील प्रभावी ठरतात, हा विश्‍वास माझ्यात निर्माण झाला. -चंद्रकांत कटाळे, रुग्ण, नाशिक 


नियमित उपचार उपयोगी 
मी उपचारासाठी आलो तेव्हा बिकट स्थिती होती. मला उभेदेखील राहता येत नव्हते. मात्र मला रुग्णालयात ॲडमिट न करताच नियमित उपचारांनी मी आता जवळपास पूर्ण बरा झालो आहे. -दत्तात्रय उपासनी (वय ७१), रुग्ण, नाशिक 

कोरोनाचा पराभव शक्य 
कोरोनाच्या भीतीनेच मी प्रारंभी पुढे काय होईल, या चिंतेत होतो. मात्र येथील उपचार व रुग्णांशी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा व्यवहार यातून ती भीती नष्ट झाली. यामुळेच कोरोनाचा पराभव रसहज शक्‍य आहे, ही भावना वाढली. 
-उदय उपासनी, रुग्णाचे नातेवाईक  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com