गुणकारी शेवग्याला अवकाळीचा फटका! उत्पादकांना उन्हाळी बहाराची अपेक्षा 

drumstick
drumstick

मालेगाव (नाशिक) : यावर्षी कोरोना महामारी त्या पाठोपाठ लावण्यात आलेला लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे तसेच इतरही उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोरोनाचे संकट सरत नाही तर लगेच अवकाळी पावसाने  शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. यंदा गुणकारी शेवगा दिमाखात बाजारात दाखल झाला. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या बिगरमोसमी पावसामुळे उत्पादनाला फटका बसला.

अवकाळीनंतर उत्पादनासह भावातही घट 

बिगरमोसमी पाऊस व बदललेल्या वातावरणामुळे शंभरी गाठलेला शेवगा सध्या ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे उत्पादन ५० टक्के घटले. नाशिक जिल्ह्यातील कसमादेतही २५ ते ३० टक्के पिकाला फटका बसला. शेवग्याचे आगर असलेल्या तमिळनाडूत बिगरमोसमी पावसामुळे उत्पादन घटले आहे. उत्पादनावर परिणाम झाला असला तरी भाव टिकून राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्पादकांना पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने आगामी उन्हाळ बहाराची मोठी अपेक्षा आहे. यंदा राज्यात अंदाजे सात हजार हेक्टर, तर नाशिक जिल्ह्यातील कसमादेत हजार ते बाराशे हेक्टरवर शेवगा लागवड झाला आहे. दिवाळीनंतर पीक बाजारात आले. सुरवातीला शंभर ते १२० रुपये किलोप्रमाणे भाव होता. 

काही ठिकाणी उत्पादनावर ५० टक्के परिणाम

बिगरमोसमी पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला. काही ठिकाणी फुलगळ झाली. शेवग्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने गुणवत्ता ढासळली. मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात बिगरमोसमी पाऊस जोरात झाला. काही ठिकाणी उत्पादनावर ५० टक्के परिणाम झाला. नाशिक जिल्ह्यातील कसमादेत बिगरमोसमी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला नसला तरी चार दिवस रिमझिम पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण व बिगरमोसमी पावसामुळे २५ ते ३० टक्के उत्पादनावर परिणाम झाला. सध्या या भागातील शेवगा मुंबई बाजारात विक्रीसाठी जात आहे. 

शेवगा उत्पादकांना उन्हाळी बहाराची अपेक्षा 

काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेवगा फलदायी ठरत आहे. त्यामुळे कसमादेत लागवड वाढत आहे. यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे विहिरींना पाणी आहे. शेततळे तसेच परिसरातील विविध साठवण तलावांत पाणी आहे. कसमादेतील चणकापूर, हरणबारी, पुनंद, केळझर आदी धरणांमधून सिंचनासाठी आवर्तन मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर उन्हाळ बहार घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. फेब्रुवारीपासून उन्हाळ बहार धरला जाईल. निसर्गाने साथ दिल्यास आगामी उन्हाळ बहार शेवग्याच्या उत्पन्नवाढीबरोबरच शेतकऱ्यांना तो मदतगार ठरू शकणार आहे. 
 

बिगरमोसमी पावसामुळे शेवग्यावर करपा रोग पडल्याने नुकसान झाले. यंदा कसमादेसह सर्वत्र पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे उन्हाळ हंगामात लागवडीत वाढ होईल. तमिळनाडूतील उत्पादन घटल्याने कसमादेसह राज्यातील शेवग्याचे भाव आगामी काळातही टिकून राहण्याची शक्यता आहे. 
- अरुण पवार , शेवगा उत्पादक, रावळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com