esakal | हलगर्जीपणा नडला...! वारंवार सांगूनही सूचनांकडे 'त्यांचा' कानाडोळा...अन् परिणाम झाला भयंकर..
sakal

बोलून बातमी शोधा

company e.jpg

सूचना देऊनही कंपनी व्यवस्थापनाने कामकाज सुरूच ठेवले होते. यादरम्यान कंपनी बसने कर्मचारी येथून नाशिकला ये- जा करतच होते. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या बसमध्ये तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन केले नाही.

हलगर्जीपणा नडला...! वारंवार सांगूनही सूचनांकडे 'त्यांचा' कानाडोळा...अन् परिणाम झाला भयंकर..

sakal_logo
By
संदीप मोगल : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (लखमापूर) एमआयडीसीतील एका कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याबद्दल पोलिस, महसूल प्रशासनाचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे हलगर्जी करणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील सर्वच कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

४४ कामगार कोरोनाबाधित

पालखेड एमआयडीसीमधील एका औषधनिर्मिती कंपनीत २४ जुलैला एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पोलिस यंत्रणा यांनी कंपनी व्यवस्थापनाला सूचना दिली होती. मात्र सूचना देऊनही कंपनी व्यवस्थापनाने कामकाज सुरूच ठेवले होते. यादरम्यान कंपनी बसने कर्मचारी येथून नाशिकला ये- जा करतच होते. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या बसमध्ये तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन केले नाही. कंपनीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगार सतत काम करत राहिले आणि याचा परिणाम म्हणजे कंपनीतील ४४ कामगार कोरोनाबाधित झाले.

कंपनी व्यवस्थापनास जबाबदार

कोरोनादरम्यान शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत संक्रमण वाढण्यास कंपनी व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात आले. यावरून व्यवस्थापक राजेंद्र रसाळ, प्रवीण भोळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी जबाबदार व्यवस्थापनाविरोधात साथरोग प्रतिबंध, कोविड- १९ उपाययोजना, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा > घरखर्च भागविण्यासाठी वडिलांसोबत लावले पिको-फॉल...भाग्यश्रीच्या यशाने आईच्या कष्टाला कोंदण! 

पालखेड औद्योगिक वसाहतीत खळबळ

कोविडसंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालखेड एमआयडीसीमधील या कंपनीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या वसाहतीतील इतर कंपन्यांचे धागे दणाणले आहेत. लखमापूर फाटा येथील एका कंपनीत ४७ कामगारदेखील व्यवस्थापणाच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात वाहतूक करताना वाहनचालकांकडून कुठलीच खबरदारी घेतली जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आणखी वाढली आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधातही गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू

संपादन - किशोरी वाघ