आपली अनुपस्थिती याच शुभेच्छा अन् तोच आहेर! कोरोनामुळे वऱ्हाडींच्या उपस्थितीवर मर्यादा

मोठाभाऊ पगार
Tuesday, 2 March 2021

आपली उपस्थिती हाच आपला आहेर, असे म्हणणाऱ्या लग्नवाल्यांना आता आपली अनुपस्थिती याच आपल्या शुभेच्छा अन् तोच आहेर, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने मर्यादित वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्न काढावे, अशा सूचना प्रशासनाने काढल्या आहेत.

देवळा (जि. नाशिक) : आपली उपस्थिती हाच आपला आहेर, असे म्हणणाऱ्या लग्नवाल्यांना आता आपली अनुपस्थिती याच आपल्या शुभेच्छा अन् तोच आहेर, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने मर्यादित वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्न काढावे, अशा सूचना प्रशासनाने काढल्या आहेत. त्यामुळे लग्नवाल्यांची सारीच नियोजने कोलमडली आहेत. 

आमंत्रण तर दिले पण..

कोरोना कमी झाला, आता दणक्यात लग्न काढू, असे म्हणणाऱ्यांना पुन्हा डोक्याला हात लावायची वेळ आली आहे. गेल्या महिन्याच्या पूर्वार्धात कोरोना कमी झाल्याने लग्नसमारंभ दणक्यात सुरू झाले. इतर लग्नवाल्यांनीही तशी नियोजने करत या महिन्यातील तारखा धरल्या. वाजंत्री, केटरर्स, मंगल कार्यालय, लॉन्स, लग्नमंडप अशा सर्वच बाबींसाठी आगाऊ रकमा देत असे सर्व काही आरक्षित केले. एवढेच काय नातेवाईक, मित्रमंडळी यांना लग्नपत्रिका, फोन, व्हॉट्सॲप संदेश करत लग्नाला येण्याचे आग्रहाचे आमंत्रणही दिले.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

प्रशासनाकडून नियम कडक

असे सर्व काही असताना आठ-दहा दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासनाने नियम कडक करण्यास सुरवात केली आहे. केवळ ५०-१०० वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा घ्यावा, जास्त गर्दी होऊ देऊ नये, संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होते की नाही याची खातरजमा केली जात असल्याने लॉन्स-मंगल कार्यालयमालक मंडळी धास्तावली आहेत. लग्न काढा पण वऱ्हाडी मंडळी कमी असावी, या अटीमुळे वर-वधूंसह लग्नवाल्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. काहींनी सकाळी मांडवाला या, काहींनी हळदीला या, तर इतरांनी लग्नाला असा मधला मार्ग काढत लग्न उरकविण्याची वेळ आली आहे. 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

मुलीचे लग्न मोठे करण्याची हौस होती. पण कोरोनामुळे निवडक नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत तसेच सॅनिटायझर व मास्कचे वाटप करत लग्नसमारंभ साजरा केला. 
-दीपक रौंदळ, प्रगतिशील शेतकरी, भेंडी, कळवण  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to Corona therere limits on the presence of guests at the wedding ceremony Nashik news