कार्यक्रमच नाहीत, संसार चालवायचा कसा? लोककलावंतांचे आर्थिक गणित कोलमडले 

तुषार महाले
Monday, 11 January 2021

एक दिवस पुन्हा आधीसारखा येईल, या आशेवर नाशिक जिल्ह्यातील लोककलांवत जगत आहे. प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने एकही कार्यक्रम होत नाही.

नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जाहीर झालेलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार हिरावले. त्यातच लॉकडाउननंतर सर्व काही सुरळीत होऊनही गर्दी होईल, अशा कार्यक्रमांना परवानगी नसल्यामुळे लोककलावंतांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

लोककलावंतांच्या संसाराचा गाडा कार्यक्रमांवरच अवलंबून
लॉकडाउनंतरही लोककलांवतांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. नाशिक जिल्ह्यात लोककलावंतांचा मोठा वर्ग आहे. काही लोककलावंतांच्या संसाराचा गाडा कार्यक्रमांवरच अवलंबून आहे.अशा कलावंतांची अजूनही उपासमार होत आहे. एक दिवस पुन्हा आधीसारखा येईल, या आशेवर नाशिक जिल्ह्यातील लोककलांवत जगत आहे. प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने एकही कार्यक्रम होत नाही. तमाशा कलावंतांनी उपोषण केल्याने त्यांना परवानगी मिळाली आहे.

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

कार्यक्रम नसल्याने लोककलावंताची धडपड

एका कार्यक्रमामागे अनेक लोककलावंतांचा संसार चालतो. त्यांना कार्यक्रमामागे दोन-तीनशे रुपये मिळतात. मात्र, कार्यक्रम नसल्याने लोककलावंत धडपड करीत आहेत. गोंधळी, मुरळींची स्थितीही बिकट असून, ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’, अशी परिस्थिती सर्वच लोककलावंतांची आहे. लॉकडाउनमध्ये अनेक सामाजिक संस्थांनी लोककलावंतांना मदत केली. मात्र, सर्व काही सुरळीत झाल्यानंतर मदतीचा ओघ कमी होत गेला. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

दागिने मोडून चालविला संसार 
लोककलावंतांचे दोन महिने बिकट गेले असून, काही कलावंतांनी दागिने मोडून संसार चालवत आहे, तर कोणी मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवत आहेत. आता कुठेच कार्यक्रम होत नसून गर्दीमुळे कार्यक्रमांना परवानगी मिळत नाही. येवला, निफाड, दिंडोरी तालुक्यांत लोककलावंत जास्त असून, कार्यक्रमांवरच त्यांचा संसार चालतो. शासनाकडून लोककलावंतांना मिळणारे मानधनही उशिराने मिळत असल्याची माहिती शाहीर बाळासाहेब भगत यांनी दिली.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to lack of programs economic problems of folk artists nashik marathi news