नाशिक विभागाला अवकाळीचा फटका; तब्बल १९ तालुक्यांतील पिके बाधित

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Wednesday, 20 January 2021

महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यामध्ये ४०९.४६ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून, कोपरगाव, श्रीरामपूर व अकोले या तीन तालुक्यांमधील द्राक्षे व ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 

नाशिक रोड : नाशिक विभागात १ ते १६ जानेवारीदरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे विभागात सहा हजार ५१६.०५ हेक्टरवरील पिकांचे व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शासनाने वर्तविला आहे. विभागीय कृषी सहसंचालकांच्या अहवालानुसार विभागातील १९ तालुक्यांत पिके बाधित झाली आहेत. 

या तालुक्यांमधील द्राक्षे व ज्वारीचे नुकसान

नाशिक जिल्ह्यात तीन हजार ५४६.२० हेक्टरवर नुकसान झाले असून, दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, निफाड, येवला या तालुक्यांमध्ये गहू, कांदा, ऊस, आंबा, द्राक्षे व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात ५९६ हेक्‍टरवर बाधित क्षेत्र असून, धुळे व शिंदखेडा तालुक्यामध्ये ज्वारी, मका व गहू यांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात ४०५.७९ हेक्‍टरवर नुकसान झाले असून, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये गहू, मका, हरभरा, ज्वारीचे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यात एक हजार ५५८ हेक्टरवर नुकसान झाले असून, जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा व भडगाव या तालुक्यांमध्ये ज्वारी, गहू, मका व कापूस या पिकांचे नुकसान झाले. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यामध्ये ४०९.४६ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून, कोपरगाव, श्रीरामपूर व अकोले या तीन तालुक्यांमधील द्राक्षे व ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, गव्हाला सर्वाधिक फटका 

नाशिक जिल्ह्यातील तीन हजार ५४६.२० हेक्‍टर बाधित क्षेत्रापैकी सर्वाधिक बाधित क्षेत्र द्राक्ष आणि गव्हाचे आहे. दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, निफाड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांना फटका बसला आहे. त्र्यंबकेश्‍वर, पेठ, येवला व निफाड या ठिकाणी मध्यम प्रमाणात गव्हाला फटका बसला आहे.  

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to untimely rain in Nashik division Crop damage 1500 hectares nashik marathi news