खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ; दसरा, दिवाळी सणांना महागाई जाणवणार

दीपक अहिरे
Tuesday, 29 September 2020

सोयाबीन व सूर्यफूल तेलाचे बाजारभाव दिवसेंदिवस उसळी घेत आहेत. प्रत्येकी पाच जणांच्या कुटुंबासाठी महिन्याला सरासरी दहा किलो खाद्यतेल लागते. त्यासाठी किमान २०० रुपयांचा झटका बसणार आहे. मागणीच्या तुलनेत सध्या खाद्यतेलाचा २० टक्के तुटवडा असल्याचे सांगितले जाते

नाशिक/पिंपळगाव बसवंत : (कोकणगाव) कोरोना महामारी सुरू असताना सर्वसामान्यांना महागाईला तोंड द्यावे लागत आहे. आता खाद्यतेल दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. गेल्या २० दिवसांत सर्वाधिक खप असलेल्या सूर्यफूल तेलाचा दर प्रतिकिलोस १३ रुपयांनी वाढला आहे. सरकी तेलाचा दरही पाच रुपयांनी वाढला आहे. 

तेलाचे बाजारभाव वाढले

सूर्यफूल दरवाढीने अन्य तेलांच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. आगामी दसरा-दिवाळी सणांनाही ही महागाई जाणवणार आहे. दोन वेळेस जेवण बनवायचे झाले तरी किमान आतपाव गोडेतेल (किमान २५ रुपयांचे) लागते. मोठे कुटुंब असेल तर अर्धा किलो म्हणजे ५० रुपये. त्यामुळे लॉकडाउनमुळे घरी बसून जिभेचे चोचले पुरवताना काटकसर कशी करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सोयाबीन व सूर्यफूल तेलाचे बाजारभाव दिवसेंदिवस उसळी घेत आहेत. प्रत्येकी पाच जणांच्या कुटुंबासाठी महिन्याला सरासरी दहा किलो खाद्यतेल लागते. त्यासाठी किमान २०० रुपयांचा झटका बसणार आहे. मागणीच्या तुलनेत सध्या खाद्यतेलाचा २० टक्के तुटवडा असल्याचे सांगितले जाते. देशात पेट्रोल-डिझेलप्रमाणे खाद्यतेलांची आयात मोठ्या प्रमाणात होते. परिणामी पाम, सूर्यफूल, शेंगदाणा तेल, सरकीची आयात कमी झाल्याने दरवाढ होत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. दैनंदिन लागणाऱ्या किराणा मालाचे भावही गगनाला भिडले आहेत. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

तेलाचे १ व २४ सप्टेंबरचे दर प्रतिकिलो 
शेंगदाणा तेल १४८ व १५६, सूर्यफूल ११५ व १२८, सोयाबीन १०६ व १०९, पाम ८८ व ९२ रुपये. 
 
कोठून होते आवक? 
शेंगदाणा तेलाची गुजरातमधून, मलेशियातून पाम, अर्जेंटिना, ब्राझील, युक्रेन, रशियातून सोयाबीन, सूर्यफुलाची आवक. 

जागतिक बाजारात सूर्यफुलाच्या कमी उपलब्धतेमुळे ३१ दिवसांत १३ रुपयांनी दरवाढ झाली. तेलबियांचे उत्पादन घटल्याचा हा परिणाम आहे. 
-संजय गणोरे, सत्यानाम किराणा, पिंपळगाव बसवंत 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

कोरोना महामारीत मजूर वर्ग उपासमारी भोगत आहे. रेशनिंगचा काळा बाजार, व्यापाऱ्यांचीच मनमानी सुरू आहे. शासनाने या काळात किराणा मालाचे भाव नियंत्रणात आणून गरीब, मजुरांना दिलासा द्यावा. 
-आम्रपाली बागूल, गृहिणी 

शासनाने खाद्यतेलाचे भाव नियंत्रणात आणावेत. त्यामुळे तेलाचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल. 
-प्रकाश हालठक्कर, नाशिक रोड, खाद्यतेलाचे होलसेल विक्रेते  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: edible oil prices increased nashik marathi news