मालेगावात ईद-ए-मिलाद प्रतिकात्मक मिरवणूक संपन्न; महिला, मुलांचाच खरा जल्लोष

प्रमोद सावंत
Friday, 30 October 2020

कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारल्याने मुस्लीम बांधवांची फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅकरॉन यांचा निषेध करण्याची संधी हिरावली गेल्याची भावना होती. दुवापठण व शहरातील विविध भागात मात्र मॅकरॉन यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

नाशिक/मालेगाव : शहरात ईद-ए-मिलाद हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती पारंपारिक पध्दतीने साजरी झाली. शहरातून ईद-ए-मिलादुन्नबीची सुमारे शंभर जणांच्या सहभागाने प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यात आली. सुन्नी जमेतुल उलेमातर्फे काढण्यात आलेल्या या छोटेखानी मिरवणुकीचे नेतृत्व मौलाना वाजीदअली यारअली नदवी, मौलाना नसीमुल हाई कादरी यांनी केले. पोलिसांनी मिरवणुकीसह मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता. कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारल्याने मुस्लीम बांधवांची फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅकरॉन यांचा निषेध करण्याची संधी हिरावली गेल्याची भावना होती. दुवापठण व शहरातील विविध भागात मात्र मॅकरॉन यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅकरॉन यांचा निषेध

मुख्य मिरवणूक रद्द झाली तरी बाळ गोपाळांनी आपापल्या विभागात छोटेखानी मिरवणूक काढून सणाचा आनंद साजरा केला. सुन्नी जमेतुल उलेमातर्फे काढण्यात आलेल्या मुख्य मिरवणुकीला सकाळी साडेआठला लल्ले चौकातून प्रारंभ झाला. मिरवणुकीत चार वाहने होती. पारंपारीक मार्गाने फिरुन दुपारी साडेबाराला मिरवणुकीचे विसर्जन झाले. मिरवणुकीत हाजी युसूफ इलियास, मुफ्ती नईम रजा मिजवाई, जावीद अन्वर, इमरान रिजवी, डॉ. रईस रिजवी, सलीम शहजाद आदींसह सुन्नी धर्मियांच्या विविध पंथांचे प्रमुख व मोजके मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर एटीटी हायस्कुलमध्ये झालेल्या दुवा पठणातही मॅकरॉन यांचा निषेध करण्यात आला. फ्रान्सच्या सरकारचे हे कृत्य अतिरेकी असल्याच्या भावना या वेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. मिरवणुकीतही काही जण निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले होते. अपर पोलिस अधिक्षक चंंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक मंगेश चव्हाण व प्रमुख पोलिस ठाण्यांचे निरीक्षक बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते.

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

महिला व मुलांचाच खरा जल्लोष

ईद-ए-मिलाद मध्ये या वेळी प्रामुख्याने महिला व मुलांचाच खरा जल्लोष आढळून आला. महिलांनी रोजे ठेवले. घरोघरी दुवापठण झाले. महिला, मुलांनी नवे कपडे परिधान केले होते. घरोघरी गाेड पदार्थ तयार करण्यात आले. यात प्रामुख्याने शिरखुर्मा, गुलाबजामून, फैनी, शाही तुकडा, मिठा पुलाव, गोड शिरा (जर्दा) यासह विविध पदार्थ बनविण्यात आले होते. मुलांनी आपापल्या विभागात मॅकरॉनच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध करतानाच ईद-ए-मिलादचा जल्लोष साजरा केला. घरोघरी ईद-ए-मिलाद व जुम्माची नमाज पार पडली.

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

व्यावसायिक हिरमुसले

मुस्लीम बांधवांचा सर्वात प्रमुख सण रमजान, बकरी ईद, शबे बारात, पाठोपाठ ईद-ए-मिलाद ही शांततेत व शासन निर्देशाप्रमाणे साजरी झाल्याने व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसला. ऐरवी या सणांना मोठी उलाढाल होते. सुमारे नऊ महिने या सणांच्या निमित्ताने झालेले नुकसान भरुन न येणारे असल्याचे व व्यवसायाला मोठी झळ बसल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eid-e-Milad symbolic procession in malegaon nashik marathi news