‘ई-लर्निंग’ला ८ टक्क्यांपर्यंत आदिवासी विद्यार्थी ‘ॲक्टिव्ह’ ..टेक्नोसॅव्ही शिक्षकांचे वाढलेले प्रमाण आशादायी 

महेंद्र महाजन
Tuesday, 4 August 2020

आदिवासी भागामध्ये मोबाईल आणि इंटरनेटच्या रेंजसाठी आवश्‍यक असलेल्या टॉवरची उभारणी झाली आहे. पण त्यातील बहुतांश टॉवर कार्यान्वित होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे आदिवासी भाग अद्यापही दूरसंचार, दळणवळणापासून कोसो मैल दूर राहिला आहे. कळवण-सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांनी टॉवर सुरू झाल्यावर दूरसंचार सेवा आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत होईल, असे सांगून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

नाशिक : शाळा बंद असताना आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून तुटू नयेत म्हणून आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील आहे. विभागाच्या पाहणीत सर्वसाधारणपणे ४० टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईलची कनेक्टिव्हिटी असल्याचे आढळून आले होते. भडगाव आणि धारणी या भागामध्ये हेच प्रमाण १० टक्क्यांपर्यंत नाही. पण प्रत्यक्षात मात्र ई-लर्निंगसाठी ८ टक्के विद्यार्थी ‘ॲक्टिव्ह’ असल्याचे विभागाला आढळून आले. त्यासाठी एकलव्य निवासी स्कूलचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. 

आश्रमशाळांमधील टेक्नोसॅव्ही शिक्षकांचे वाढलेले प्रमाण आशादायी 
एकलव्य निवासी स्कूल राज्यात २४ ठिकाणी आहे. त्यामध्ये पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील तीन हजार १६ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांकडे मोबाईलचा ‘ॲक्सेस’ उपलब्ध आहे. प्रत्यक्षात ४०० विद्यार्थी ‘ॲक्टिव्ह’ आहेत. आता ही सारी परिस्थिती कशामुळे घडत असणार बरे? आदिवासी विद्यार्थ्यांचे पालक कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात. मोबाईल त्यांच्यासमवेत असतो. त्यामुळे तो विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध होणे अशक्यप्राय आहे. विशेषतः एकलव्य निवासी स्कूलमधील शिक्षक दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायंकाळनंतर संवाद साधतात. त्यांच्याकडून धडे गिरवून घेतात. रविवारी सुटीच्या दिवशीही शिक्षकांचे अध्यापन सुरू असते. विभागाने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे उपलब्ध माहितीनुसार वर्ग आणि इयत्तेनिहाय व्हॉट्सॲप ग्रुप शिक्षकांनी तयार केले आहेत. त्याद्वारे शिक्षक माहिती पाठवत राहतात. प्रत्यक्षात ती माहिती किती विद्यार्थ्यांपर्यंत पोचते आणि त्याचा उपयोग स्वयंअध्ययनासाठी होतो ही बाब सर्वेक्षणातून पुढे येण्यास मदत होणार आहे. ही जरी परिस्थिती असली, तरीही आश्रमशाळांचे शिक्षक टेक्नोसॅव्ही होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. हे आशादायी चित्र राज्यभर पाहायला मिळते. 
 
शिक्षकांचे गणित अध्यापनाचे शिक्षण 
सरकारी आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी स्कूलमधील जवळपास ४०० शिक्षकांचे ऑनलाइन शिक्षण झाले. त्यामध्ये सहावी ते बारावीच्या गणित विषयाच्या शिक्षकांचा समावेश होता. त्याचबरोबर एकलव्य स्कूलमधील जवळपास ४५ शिक्षकांनी ई-लर्निंगसाठी व्हिडिओची निर्मिती केली आहे. हे व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनातसुद्धा उपयोगी आणता येणार आहेत. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

आमदार नितीन पवार यांनी जिल्हा प्रशासनाचे वेधले लक्ष 
आदिवासी भागामध्ये मोबाईल आणि इंटरनेटच्या रेंजसाठी आवश्‍यक असलेल्या टॉवरची उभारणी झाली आहे. पण त्यातील बहुतांश टॉवर कार्यान्वित होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे आदिवासी भाग अद्यापही दूरसंचार, दळणवळणापासून कोसो मैल दूर राहिला आहे. कळवण-सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांनी टॉवर सुरू झाल्यावर दूरसंचार सेवा आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत होईल, असे सांगून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ग्रामविकास यंत्रणेच्या माध्यमातून माहिती घेतल्यावर धक्कादायक माहिती पुढे आली. कळवण तालुक्यातील २४ पैकी १७ टॉवरवर ‘शेअरिंग’ प्रणालीचा उपयोग करण्यात आला आहे. मात्र अभोणा, कनाशी, दळवट या दुर्गम भागातील टॉवर सुरू होऊ शकलेले नाहीत. तसेच पेठ तालुक्यातील २४ पैकी १२ टॉवरला वीज कनेक्शन मिळाले असून, सात टॉवर सुरू आहेत. सुरगाणा तालुक्यातील वन विभागाच्या जमिनीवर उभारलेल्या टॉवरला वन विभागाची ना-हरकत मिळाली नसल्याने टॉवर कार्यान्वित झाले नसल्याचे सांगण्यात आले.  

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

रिपोर्ट - महेंद्र महाजन

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Up to eight percent of e-learning students are active nashik marathi news