आठवी उत्तीर्ण अयानला "अभियांत्रिकी'तही गती ..विद्यार्थ्यांसाठी ठरतोय हक्काचा हेल्पिंग हॅंड! 

राजेंद्र बच्छाव : सकाळ वृत्तसेवा 
Friday, 14 February 2020

अयान मन्सुरी असे या अवलियाचे नाव. गेल्या 13 वर्षांत त्याने भावी अभियंत्यांना असे शेकडो प्रकल्प करून दिले आहेत. फक्त संबंधित यंत्राची लिंक पाठवायची वा त्यासंबधी इत्थंभूत माहिती दिली की हुबेहूब यंत्र तयार, इतकी मास्टरी त्याने या क्षेत्रात मिळविली आहे. तुमच्यात प्रतिभा असेल, तर त्याच्या जोरावर हवे ते साध्य करता येऊ शकते, याचे उदाहरणच जणू अयानने प्रत्यक्ष कृतीतून सर्वांसमोर उभे केले आहे. 

नाशिक : त्याने महापालिकेच्या शाळेत अवघे आठवीपर्यंत शिक्षण घेतले अन्‌ बालपणापासूनच विविध यंत्रांमध्ये रमण्याचा एकमेव छंद जोपासला. त्याद्वारे केवळ कल्पना करून प्रत्यक्ष काम करणारी छोटी-मोठी यंत्रे तयार करत असतानाच आज तो नाशिकच नव्हे, तर पुण्याच्या देखील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना विविध विषयांवरचे प्रकल्प तयार करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून पुढे आला आहे. 

डिप्लोमा, डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी ठरतोय हक्काचा हेल्पिंग हॅंड 

अयान मन्सुरी असे या अवलियाचे नाव. गेल्या 13 वर्षांत त्याने भावी अभियंत्यांना असे शेकडो प्रकल्प करून दिले आहेत. फक्त संबंधित यंत्राची लिंक पाठवायची वा त्यासंबधी इत्थंभूत माहिती दिली की हुबेहूब यंत्र तयार, इतकी मास्टरी त्याने या क्षेत्रात मिळविली आहे. तुमच्यात प्रतिभा असेल, तर त्याच्या जोरावर हवे ते साध्य करता येऊ शकते, याचे उदाहरणच जणू अयानने प्रत्यक्ष कृतीतून सर्वांसमोर उभे केले आहे. 

"कुणाला अभ्यासक्रमासाठी प्रकल्पाबाबत मदत हवी असल्यास संपर्क साधावा

अयानने आठवीनंतर शाळा सोडली अन्‌ वडील फजल मन्सुरी यांच्या पारंपरिक फॅब्रिकेशनच्या कामात रमू लागला. आई मैहराज यांच्यासोबत फिरणे आणि सुचेल तशी यंत्रे बनविणे हा उद्योग सुरू झाला. त्यात मित्रांच्या सांगण्यावरून 2007 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी त्याने कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एका हॉटेलमध्ये "कुणाला अभ्यासक्रमासाठी प्रकल्पाबाबत मदत हवी असल्यास संपर्क साधावा' अशी जाहिरात केली आणि सर्वप्रथम रोहित नावाच्या विद्यार्थ्याला त्याने "हेवीलोड ट्रक' तयार करून दिला. त्या प्रकल्पामुळे मिळालेल्या प्रसिद्धीतून शहरातील जवळपास सर्वच महाविद्यालये आणि शाळांमधून त्याला शुल्क ठरवून प्रकल्प तयार करण्यासाठी बोलावणे येऊ लागले. पुण्याच्या एका विद्यार्थ्यासाठी तयार केलेली रिमोटवर चालणारी पेट्रोल कार तर चक्क व्यावसायिक स्पर्धेत सहभागी झाली होती. 

शहरातील एक नामवंत कारागीर

हे सर्व करत असताना मोटर वाइंडिंग आणि पॉवर टूल रिपेअरिंगमध्ये तो शहरातील एक नामवंत कारागीर म्हणून ओळखला जातो. कासीम शेख यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर त्याने स्वतः अनेक इनोव्हेटिव्ह टूल्स तयार केली आहेत. झाडे कापण्यासाठी आवश्‍यक पेट्रोलवर चालणारे चेन्सो पॉवर टूल त्याने भंगार बाजारातून आणून त्याच्यावर संशोधन करून विकसित केले आहे. अनेक प्रकारचे कटर, ग्राइंडर आणि इतर यांत्रिक साधने तो केवळ दुरुस्त करत नाही, तर त्याच्यावर त्याच पद्धतीने संशोधन करून त्याची कार्यक्षमतादेखील वाढवतो आहे. लासलगाव येथील फर्जंद सय्यद यांच्या ब्लू एनर्जी कंपनीसाठी त्याने ट्रान्स्फॉर्मरसाठीचे वाइंडिंग मशिन आणि त्याला आवश्‍यक ओव्हनदेखील विकसित करून दिले आहे. गादी व्यावसायिकांनादेखील त्यांच्या रिक्षाच्या चाकालाच विशिष्ट प्रकारची ऍडजस्टमेंट करून त्याने त्यांचे काम सोपे करून दाखविले आहे. 

संगणकाचेही मिळविले ज्ञान 
विशेष म्हणजे, हे सर्व करताना संगणकाचे ज्ञान आवश्‍यक असल्याने त्याने तेदेखील मिळविले आहे. विद्यार्थ्यांसाठी तयार कराव्या लागणाऱ्या अनेक प्रकल्पात आता सॉफ्टवेअर्सदेखील आवश्‍यक असतात. त्याचादेखील त्याने अभ्यास सुरू केला आहे. पत्नी सना आणि लहानगा नूर अशा त्रिकोणी कुटुंबात लहान भाऊ अर्शद आणि बहीण अजमत यांचे त्याला मोठे सहाय्य मिळत आहे. 

हेही वाचा > अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..

मी स्वत: शिकलो नाही...पण शिकविल्याचे मोठे समाधान

लहानपणापासून असलेली आवड या व्यवसायाच्या माध्यमातून जोपासत आहे. कोणतेही जुने मशिन आणणे आणि त्याच्यावर संशोधन करणे, हा माझा छंद आहे. विद्यार्थ्यांना कच्चा माल कुठे मिळतो याचे ज्ञान नसते. त्यामुळे त्यांचे प्रकल्प करून देताना मी स्वत: शिकलो नाही तरीदेखील त्यांना शिकविल्याचे मोठे समाधान मला मिळते. म्हणूनच आजपर्यंत मी मार्गदर्शन केलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पांत मिळालेल्या "अ' श्रेणी या जणू मलाच मिळाल्या आहेत, असे मी मानतो. -अयान मन्सुरी 

हेही वाचा > गर्भपाताच्या गोळ्या देऊन प्रियकराने चक्क 'तिचा' गर्भपातही केला...त्यानंतर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eighth-pass Ayan got success in engineering Nashik Marathi news