सावधान..! नाशिकमध्ये वाढतोय इलेक्ट्रॉनिक्स कचरा; खासगी ऑपरेटरकडून संकलनासाठी प्रस्ताव 

विक्रांत मते
Sunday, 21 February 2021

मेट्रो शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असताना द्वितीय श्रेणीच्या शहरांतही भविष्यात समस्या वाढत असल्याने नियोजनाचा भाग म्हणून नाशिक शहरात विभागनिहाय इलेक्ट्रॉनिक्स कचरा (ई-वेस्ट) संकलन केंद्रे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : मेट्रो शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असताना द्वितीय श्रेणीच्या शहरांतही भविष्यात समस्या वाढत असल्याने नियोजनाचा भाग म्हणून नाशिक शहरात विभागनिहाय इलेक्ट्रॉनिक्स कचरा (ई-वेस्ट) संकलन केंद्रे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट ऑपरेटर एजन्सीने महापालिकेला प्रस्ताव सादर केला असून, आडगाव व पाथर्डी येथील कचरा डेपोच्या बाजूला ई-वेस्टची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले जाणार आहे. 

मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली व पुण्यासारख्या मेट्रो शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना घनकचऱ्यासोबतच नादुरुस्त फ्रीज, टीव्ही, संगणक यासारख्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचा कचरा वाढत आहे. घनकचरा उचलण्याची सोय सर्वच शहरांमध्ये आहे, परंतु ई-वेस्टबाबत फारशी जागरूकता दिसत नाही. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने मोठ्या शहरांत आता घनकचऱ्याबरोबर इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्याची सोय लावण्याची सूचना केली आहे. शहर विकास आराखड्यामध्ये स्वतंत्र जागा राखीव ठेवण्याच्या सूचना यापूर्वी दिल्या आहेत. कमी प्रमाणात ई-वेस्ट बाहेर पडत असले तरी, त्याचे नियोजन आतापासूनच करण्याचा भाग म्हणून महापालिकेने पावले उचलली आहेत. 

घनकचऱ्यापेक्षाही धोकादायक ई-वेस्ट 

फ्रीज, टीव्ही, संगणकासारख्या इलेक्‍ट्रॉनिक्स उपकरणांत पारा, शिसे, कॅडमियम, क्रीमियम अशी विषारी रसायने आणि पॉलिब्रॉमिनिटेड बायफेनाईल यासारखी अग्निरोधके घटक असतात. ते घटक बाहेर पडल्यास प्रदूषण वाढते. शिवाय त्या वस्तूंचा स्फोट झाला तरी जीवितहानी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये अशा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. मेट्रो शहराकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये भविष्याचा विचार करून आतापासूनच ईलेक्ट्रॉनिक्स कचरा संकलनाबरोबरच विल्हेवाटीचे नियोजन केले जात आहे. 
 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

ई-वेस्ट म्हणजे काय? 

नादुरुस्त किंवा बंद पडलेले टीव्ही, फ्रीज, संगणकाचे मॉनिटर, हॉस्पिटल तसेच कारखान्यांमधील यंत्रसामग्री, बंद पडलेले मोबाईल, सीडी, डिव्हीडी, फिल्म, बंद पडलेली घड्याळे, रिमोट कंट्रोल, नादुरुस्त बल्ब, ट्यूबलाइट यांचा समावेश इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्यात होतो. नव्या परिभाषेत अशा प्रकारच्या टाकाऊ इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना ई-वेस्ट संबोधले जाते. टीव्ही, फ्रीज, ट्यूबलाइट, बल्ब यात गॅस असतो. कालांतराने हा गॅस बाहेर पडतो. त्यातून प्रदूषण होते. त्यामुळे एका जागी संकलित करून विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पर्यावरण विभागानेही महापालिकांना ई-वेस्ट संकलनाच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी शहर विकास आराखड्यात जागेची तरतूद करण्याच्या सूचना आहेत. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

शहरात ई-वेस्ट मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्या वस्तूंची विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही एजन्सीजनी प्रस्ताव दिले असून, त्यावर लवकर निर्णय घेऊन ई-वेस्ट संकलनासाठी जागा देण्याचे नियोजन करू. 
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका  

 


 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electronics waste is on the rise in Nashik Marathi news