अकरावी प्रवेश खोळंबल्‍याने विद्यार्थी-पालकांचा मनस्‍ताप; शैक्षणिक नुकसानाचीही भीती

अरुण मलाणी
Tuesday, 27 October 2020

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. इयत्ता दहावीचा निकालदेखील नेहमीच्‍या वेळापत्रकापेक्षा उशीराने जाहीर झाला होता. कशीबशी इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरूदेखील झाली होती.

नाशिक : इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असतांना मराठा आरक्षणाच्‍या मुद्यावरुन दुसऱ्या फेरीच्‍या प्रक्रियेला शिक्षण विभागाने स्‍थगिती दिली होती. अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपलेला असतांना, निम्‍मे शैक्षणिक वर्ष सरूनही प्रवेश होत नसल्‍याने विद्यार्थी-पालकांकडून मनस्‍ताप व्‍यक्‍त केला जातो आहे. प्रक्रिया लांबल्‍याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्‍यक्‍त केली जाते आहे. परीस्‍थितीचे गांभीर्य ओळखत तांत्रिक त्रृटीतून मार्ग काढत प्रवेश प्रक्रियेला गती देण्याची अपेक्षा व्‍यक्‍त होते आहे. 

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. इयत्ता दहावीचा निकालदेखील नेहमीच्‍या वेळापत्रकापेक्षा उशीराने जाहीर झाला होता. कशीबशी इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरूदेखील झाली होती. त्‍यातच विशेष आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणाला सर्वोच्च न्‍यायालयातून मिळालेल्‍या स्‍थगितीनंतर दुसऱ्या फेरीपासून पुढील प्रक्रिया स्‍थगित केली होती. गेल्‍या १० सप्‍टेंबरला दुसरी निवड यादी जाहीर केली जाणार होती. तब्‍बल ४७ दिवस उलटून गेलेले असतांना, अद्यापपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत झालेली नाही. विद्यार्थ्यांच्‍या करिअरच्‍या दृष्टीने बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम अत्‍यंत महत्त्वाचा समजला जातो. विज्ञान शाखेत तर इयत्ता अकरावी आणि बारावीच्‍या शिक्षणक्रमावर आधारीत विविध पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियांचा अभ्यासक्रम असतो. असे असतांना प्रक्रिया रखडल्‍याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

महाविद्यालयांपुढे पेच 

सामान्‍यतः प्रवेशाच्‍या वेळापत्रकासोबत अध्ययन सुरू करण्याच्‍या तारखेची घोषणा केली जाते. किंवा महाविद्यालयात उपलब्‍ध जागांपैकी बहुतांश जागा भरल्‍यावर अध्ययन प्रक्रिया सुरू करण्याच्‍या सूचना शिक्षण विभाग देत असते. परंतु अकरावी प्रवेशाची पहिली फेरी झालेली असतांना, त्‍यात फारसे प्रवेश झालेले नाहीत. या विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचा की नाही, असा पेच महाविद्यालयांपुढे उभा राहिला आहे. अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतल्‍यास, नंतरहून प्रवेशित होणार्या विद्यार्थ्यांसाठी पुन्‍हा नव्‍याने वर्ग घ्यावा लागण्याची वेळ येऊ येणार असल्‍याने महाविद्यालयांपुढील आव्‍हान वाढले आहे. दुसरीकडे अध्ययन प्रक्रियेला विलंब झाल्‍याने मर्यादित वेळेत शिक्षणक्रम पूर्ण करणे कठीण होणार असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

अशी आहे नाशिक महापालिका हद्दीतील 
कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशाची स्‍थिती 

कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या---------६० 
उपलब्‍ध जागा---------------------२५ हजार २७० 
प्रवेशासाठी नोंदणीकृत विद्यार्थी--------३१ हजार ४६० 
प्रवेश निश्‍चित केलेले विद्यार्थी-----------८ हजार १८३ 
प्रवेशासाठी रिक्‍त जागा---------------१७ हजार ०८७ 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh admission process stalled nashik marathi news