
शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी सातपर्यंत व्हिडिओ कॉलद्वारे शेकडो किलोमीटर अंतरावरील माझ्या काळजाच्या तुकड्याशी दोन तास संभाषण केले आणि दुसऱ्याच दिवशी शनिवारी (ता. २१) सकाळी सातला मेजर गौरव यांचा फोन आला, ‘आपका बेटा शहीद हो गया...’
पिंगळवाडे (नाशिक) : शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी सातपर्यंत व्हिडिओ कॉलद्वारे शेकडो किलोमीटर अंतरावरील माझ्या काळजाच्या तुकड्याशी दोन तास संभाषण केले आणि दुसऱ्याच दिवशी शनिवारी (ता. २१) सकाळी सातला मेजर गौरव यांचा फोन आला, ‘आपका बेटा शहीद हो गया...’ हे ऐकताच, ‘साहब, आप झुठ बोल रहे है... हमने रातकोही अपने बेटेसे बात की, हमे विश्वास नही होता...’, असे बोलतच मी पुरता कोसळलो. आमचं होत्याचं नव्हतं झालं! वयाच्या २५ व्या वर्षी देशसेवा करताना कुलदीप आम्हाला सोडून गेला असला तरी त्याचा १७ दिवसांचा चिमुकला हर्षवर्धन हा ‘कुलदीपक’च आता आमच्या जीवनाचा आधार असल्याची हृदयद्रावक भावना पिंगळवाडे (ता. बागलाण) येथील शहीद कुलदीप जाधव यांचे वडील नंदकिशोर जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
गावावर असलेली शोककळा अजूनही कायम
गेल्या शनिवारी जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे पिंगळवाडेचे भूमिपुत्र कुलदीप शहीद झाले. मंगळवारी (ता. २४) पिंगळवाडे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर रविवारी (ता. २९) शहीद जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पिंगळवाडे गावात प्रवेश करताच आठ दिवसांपासून गावावर असलेली शोककळा अजूनही कायम असल्याचे जाणवले. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी आपल्या गावातील एक तरुण देशसेवेची उर्मी उराशी बाळगून सैन्यदलात भरती होतो काय अन् वयाच्या २५ व्या वर्षी शहीद होतो काय, या विचारांतून गावातील प्रत्येक ग्रामस्थ व युवकांना कुलदीपचा मोठा अभिमान वाटत असल्याचे जाणवत होते.
असा होता सैन्यदलात दाखल होण्याचा प्रवास
शहीद जाधव यांच्या घरी स्मशान शांतता होती. सर्वच शोकाकुल भाऊबंदांचे सांत्वन केले जात होते. ते कुलदीपच्या जन्मापासूनच्या आठवणींना उजाळा देत अधूनमधून अश्रूंना वाट मोकळी करून देत होते. कुलदीपचे वडील नंदकिशोर जाधव म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करून मी स्वत:चे शिक्षण केले. नीताशी विवाह झाल्यानंतर देवपूरपाडे (ता. देवळा) येथे ५ सप्टेंबर १९९६ ला कुलदीपचा जन्म झाला. चांदवड येथील नेमिनाथ जैन विद्यालयात पहिली व दुसरी, सटाणा येथील प्रगती विद्यालयात पाचवीपर्यंत तर, लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंत त्याने शिक्षण घेतले. बालपणापासून खेळाची आवड असलेल्या कुलदीपने मराठा हायस्कूलमध्ये धावण्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता. शालेय जीवनापासूनच त्याला कबड्डी, खो-खो आणि कुस्ती या खेळांची विशेष आवड होती. वयाच्या १५ व्या वर्षपासूनच गावोगावच्या जत्रांमध्ये कुस्ती खेळण्याचा त्याला छंद जडला. मैदानी खेळांबरोबरच जिवाभावाच्या मित्रांचा गोतावळा जमविण्याची त्याला आवड होती. बारावीसाठी कुलदीपने मेशी (ता. देवळा) येथील जनता विद्यालयात प्रवेश घेऊन उत्तीर्ण झाला. त्याचा केरसाणे (ता. बागलाण) येथील आतेभाऊ स्वप्नील मोरे हा सैन्यदलात असल्याने त्याचा गणवेश व सैन्यदलातील घटना ऐकून कुलदीपला सैन्यदलाची ओढ निर्माण झाली अन् त्याने देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे ठरवले. २०१५ मध्ये भरतीच्या पहिल्याच प्रयत्नात रायगड येथे मराठा बटालियनमध्ये तो भरती झाला. दरम्यान, २०१७ मध्ये किकवारी (ता. बागलाण) येथील नीलम हिच्याशी त्याचा विवाह झाला.
हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत
चिमुकल्याला प्रत्यक्ष भेटण्याची ओढ अपुरीच...
सैन्यदलात भरतीनंतर बंगलोर येथे खडतर सैनिकी प्रशिक्षणादरम्यान त्याने पहिल्याच वर्षी कबड्डीत सुवर्णपदक मिळवले. यानंतर त्याची बंगलोर येथेच नियुक्ती झाल्याने पुढील चार वर्षे तेथेच कर्तव्य बजावले.
सहा महिन्यांपूर्वी भारत- पाकिस्तान सीमेवरील अत्यंत तणावग्रस्त राजौरी सेक्टरमध्ये त्याची नियुक्ती झाली. त्यावेळी लॉकडाउन असतानाही तो आम्हाला भेटण्यासाठी सुटीवर सटाणा येथे आला होता. २१ नोव्हेंबरला त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. तत्पूर्वी २० नोव्हेंबरला सायंकाळी सातपर्यंत सलग दोन तास त्याने व्हिडिओ कॉलद्वारे आम्हा सर्वांशी गप्पा मारल्या. आपल्या चिमुकल्याला प्रत्यक्ष भेटण्याची ओढ त्याला लागली होती. उद्या मुलाला भेटण्यासाठी सुटीवर येणार असल्याची शुभवार्ताही त्याने आम्हाला दिली होती. त्याची आई नीता आपल्या मुलाच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती. कुलदीप घरी येणार या आनंदातच आम्ही रात्री झोपलो आणि ती काळरात्र संपताच शनिवारी सकाळी सातलाच मेजर गौरव यांचा फोन आला... नंतर मी पत्नी व लहान मुलगा जयेश यांनाही याबाबत सांगितले. आमचा कुलदीप शहीद झाल्याच्या बातमीने आमचं सर्वस्व हरवले आहे. आता फक्त त्याच्या आठवणी हेच आमच्या जगण्याचे साधन आहे.
हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय
शहीद कुलदीप जाधव यांच्या आठवणी कायमस्वरूपी स्मरणात असाव्यात यासाठी पिंगळवाडे ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थ आणि तरुण मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी एका रात्रीत गावातील मध्यवर्ती ठिकाणी कुलदीपचे स्मारक उभारले. त्यासाठी सरपंच लताबाई भामरे, उपसरपंच संजय भामरे, ग्रामपंचायत सदस्य मंगल भामरे, अरुण बागूल, गंगाधर भामरे, पप्पू शिंगारे, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र भामरे, नामपूर बाजार समितीचे संचालक कृष्णा भामरे, माजी सरपंच दौलत पाटील, पोलिसपाटील बाजीराव भामरे, शिवाजी बागूल, ग्रामसेवक सुनील ठोके, तलाठी मनोज भामरे, सदाशिव कोठावदे, दगडू अहिरे, लक्ष्मण भामरे, मुरलीधर भामरे, नितीन भामरे आदींसह तरुण मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुटीत गावी आलेला कुलदीप शेतीत रममाण होत असे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात हुतात्मा झालेले पिंगळवाडेचे शेतकरी भागा काळू बागूल यांच्या बलिदानाची ग्रामस्थांनी आठवण करून दिली. गावातीलच वीर जवान कुलदीप देशसेवेसाठी शहीद झाल्यामुळे ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा पिंगळवाडे गावाने सार्थ ठरवली असल्याची भावना द्राक्षबागायतदार व सोसायटीचे अध्यक्ष केदा भामरे यांनी व्यक्त केली.