खड्डे बुजविण्याऐवजी अभियंत्याची मात्र फार्महाउसवर लॉबिंग; सभापतींनी दिल्या खड्डेमुक्त करण्याच्या सूचना  

विक्रांत मते
Friday, 25 September 2020

चार ते पाच वर्षांपूर्वी शहरात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानंतर रस्त्यांच्या गुणवत्तेवरून प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे अभियंता मात्र बदलीसाठी एका फार्महाउसवर लॉबिंग करत असल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २४) समोर आले आहे.

नाशिक : चार ते पाच वर्षांपूर्वी शहरात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानंतर रस्त्यांच्या गुणवत्तेवरून प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे अभियंता मात्र बदलीसाठी एका फार्महाउसवर लॉबिंग करत असल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २४) समोर आल्याने तूर्तास त्यांच्याकडे कुठलीच महत्त्वाची जबाबदारी न देण्याच्या सूचना स्थायी समिती सभापतींनी दिल्या. 

फार्महाउसवर लॉबिंग 
गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे नितीन वंजारी काही दिवसांपासून प्रशासनातील मोठ्या पदावर बसण्यासाठी लॉबिंग करत आहेत. कधी आमदार, तर कधी पालिकेतील वजनदार पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठे पद मिळविण्याच्या तयारीत असल्याने त्याचा संदर्भ देत फार्महाउसवर बदल्यांसाठी लॉबिंग करण्यापेक्षा आठ दिवसांत खड्डे बुजविण्याची मागणी केली. शहरातील सर्व खड्डे बुजविले जात नाहीत तोपर्यंत, वंजारी यांच्याकडे कुठलीही महत्त्वाची जबाबदारी न देण्याच्या सूचना सभापती गणेश गिते यांनी दिल्या.  

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

आठ दिवसांत खड्डेमुक्त करण्याच्या सभापतींच्या सूचना 
चार ते पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाली असून, सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु यंदा पावसाळ्यात रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने महापालिकेच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या कामकाजावर शंका व्यक्त केली गेली. ऑनलाइन महासभेत शिवसेनेचे नगरसेवक संतोष गायकवाड यांनी खड्ड्यात बसून आंदोलन केल्याने रस्त्यांचा मुद्दा अधिक चर्चेला आला. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीदेखील सत्ताधारी भाजपवर आरोप करत ठेकेदारांशी भागीदारी असल्याचा आरोप केला होता. आरोप-प्रत्यारोपात सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी मनसेच्या सत्ताकाळातील रस्ते असल्याचे उत्तर देऊन मनसेवर निशाणा साधला. मात्र मनसेच्या सत्ताकाळात भाजपदेखील पार्टनर असल्याची आठवण करून दिल्याने सत्ताधारी भाजपची बोलती बंद करण्यात आली. दरम्यान, रस्त्यांवरील खड्ड्यांवरून वाद रंगला असताना स्थायी समितीमध्ये नगरसेवक राहुल दिवे यांनी प्रभाग २२ मधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे छायाचित्र दाखवून दाहकता समोर आणली. शहर अभियंता संजय घुगे व गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अभियंता नितीन वंजारी यांच्या कारभारावर शंका घेत फार्महाउसचे प्रकरण समोर आणले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: engineer lobbied on the farmhouse nashik marathi news