'ते' लेटरहेड माझे असतील तर ते नक्कीच बनावट असतील -  माजी आमदार आसीफ शेख

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 3 November 2020

मुंबई पोलिसांनी नुकतीच एका टोळीला अटक केली. ही टोळी बांगलादेशातून आलेल्यांना भारतीय नागरिकत्व मिळवून देत असल्याचे बोलले जाते. या टोळीकडे "एमआयएम' आणि कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांचे लेटरहेड मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यावर शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मालेगाव (जि.नाशिक) : लेटरहेड कोणाचे आहेत, याची खातरमजा करणार आहे. माझे लेटरहेड असतील तर ते नक्कीच बनावट असतील. त्याबाबत मी तक्रार करीन. असे कॉंग्रेसचे माजी आमदार आसीफ शेख यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी नुकतीच एका टोळीला अटक केली. ही टोळी बांगलादेशातून आलेल्यांना भारतीय नागरिकत्व मिळवून देत असल्याचे बोलले जाते. या टोळीकडे "एमआयएम' आणि कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांचे लेटरहेड मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यावर शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही एक वर्षापासून तक्रार करतोय

बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आल्यानंतर त्यांचे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट बनवून देणाऱ्या टोळीकडे मालेगावच्या "एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती आणि कॉंग्रेसचे माजी आमदार आसीफ शेख यांचे लेटरहेड सापडले. हा विषय राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावर यासंदर्भात शेख यांच्याशी संपर्क साधला असता लेटरहेड बनावट आहेत. मात्र याबाबत आम्ही एक वर्षापासून तक्रार करतोय. त्यावर कारवाई झाली नाही. पोलिसांनी प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कारवाई करावी,असे म्हणाले

प्रकरणाचे धागेदोरे मालेगावशी संबंधीत

भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत या आमदारांनाही अटक करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात उल्लेख झालेले "एमआयएम'चे आमदार मौलाना मुफ्ती हे मालेगावचे विद्यमान आमदार आहेत. तर दुसरे आसीफ शेख हे माजी आमदार आहेत. मालेगावच्या मदरशातून देखील मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे मालेगावशी संबंधीत असल्याचे स्पष्ट होते. 
 

प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्यावर गंभीर कारवाई करावी - शेख           आसीफ शेख म्हणाले, या प्रकरणाची सुरवात मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 च्या पोटनिवडणूकीवेळी आढळली. या प्रभागात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याचे आढळले होते. हे माझ्या लक्षात आल्यावर त्याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या भागातील एका आधार केंद्रातून हे बोगस आधार कार्ड तयार करण्याचे काम चालते, त्याचे नाव देखील कळवले होते. त्यानंतर मी सबंध मतदारयादीचा अभ्यास केला. व दरमहा एक हजार बोगस मतदार शोधून त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली होती. हे अत्यंत गंभीर प्रकरण असुन संबंधीत यंत्रणा मात्र त्यावर गांभिर्याने कारवाई करीत नाही, असे दिसते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्यावर गंभीर कारवाई करावी, असे शेख यांनी सांगितले. 

 

अटक झालेल्या टोळीने ज्याप्रमाणे आधारकार्ड व अन्य बनावट कागदपत्रे बनविली, तशीच त्यांनी बनावट लेडरहेडदेखील बनविली असावीत, असा संशय आहे. कोरी लेटरहेड कोणालाही दिली नाहीत. - मौलाना मुफ्ती मोहमद इस्माईल, आमदार, एमआयएम.

 

शहरातील बोगस व दुबार नावे असलेल्या मतदारांविरुद्ध सहा महिन्यांपासून आपण मोहीम उघडली आहे. ही नावे मतदार यादीतून काढून टाकण्याची मागणी सातत्याने केली आहे. शासनाने बोगस आधारकार्ड व पासपोर्टची चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी.  -आसिफ शेख, माजी आमदार, मालेगाव मध्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MLA ashif shaikh comment on letter head malegaon nashik marathi news