येवल्यात कर्जवाटपाचा लक्ष्यांक पार; भांडवलासाठी कर्ज मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार

संतोष विंचू 
Wednesday, 9 September 2020

जिल्हा व राष्ट्रीयीकृत बँकांनी मिळून तालुक्यात खरिपासाठी ६५ कोटींच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक पार करत आठ हजार शेतकऱ्यांना ६६ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्जवाटप पूर्ण झाले आहे. 

नाशिक/येवला : खरिपाच्या तोंडावर मागील दोन वर्षे शेतकऱ्यांना भांडवल उभे करण्यासाठी ‘कर्ज देता का कर्ज’ असे म्हणण्याची वेळ आली होती. या वर्षी कर्जमाफीमुळे जिल्हा बँकेची सुधारलेली परिस्थिती आणि शासनाने राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांना केलेल्या सक्तीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. तसेच जिल्हा व राष्ट्रीयीकृत बँकांनी मिळून तालुक्यात खरिपासाठी ६५ कोटींच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक पार करत आठ हजार शेतकऱ्यांना ६६ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्जवाटप पूर्ण झाले आहे. 

तालुका दुष्काळी असल्यामुळे बागायतदारांचे प्रमाण अल्प असून, खरीप सुरू होताच भांडवल उभे करण्यासाठी कर्जाची गरज शेतकऱ्यांना भासते. मे-जूनमध्ये जिल्हा बँकेच्या आशीर्वादाने गावातील विविध सहकारी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना कर्जातून भांडवल उभे करता यायचे. मात्र कर्जमाफीनंतर जिल्हा बँक अडचणीत आल्याने गेल्या तीन वर्षांपासून ही प्रक्रिया विस्कळित झाली होती. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

नव्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा मोठा फायदा जिल्हा बँकेला झाल्याने दोन वर्षांच्या खंडानंतर या वर्षी बऱ्यापैकी सुरळीत कर्जवाटप झाले आहे. नव्या-जुन्यासह कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही एकरी १० ते २० हजारांचे कर्जवाटप झाल्याने सोसायट्यांचे कामकाजही सुरळीत झाले असून, अद्यापही कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनीदेखील या कर्जवाटपात मोठा हातभार लावल्याने तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. 
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कर्जवाटपाला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक बैठकीत मागेल त्या गरजू शेतकऱ्याला कर्ज मिळायला पाहिजे, अशी भूमिका मांडली. याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांनीही बँकेकडे अधिकाधिक निधीसाठी आग्रह धरला. प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनीही सतत पाठपुरावा करून बँकांना उद्दिष्टपूर्ती करण्याचा आग्रह धरल्याने उद्दिष्ट पूर्ण होऊन ६७ कोटींच्या वाटपातून तब्बल सात हजार ९५४ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

 
कोरोनामुळे शेतकरीही अडचणीत असल्याने भांडवलासाठी कर्ज मिळावे या मागणीचा आम्ही नेहमीच पाठपुरावा केला आहे. आता बँकेचे कामकाज सुरळीत होत आहे. आतापर्यंत सुमारे ३२ कोटी रुपयांचा निधी तालुक्यासाठी मिळविला असून, कर्जवाटप ३५ कोटींपर्यंत नेण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
-किशोर दराडे, आमदार, संचालक जिल्हा बँक 

कर्जवाटपाचे आकडे... 
बँक - लक्ष्यांक आजपर्यंत कर्जवाटप शेतकरीसंख्या 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ३५ कोटी ३१ कोटी २१ लाख ५,९५९ 
राष्ट्रीयीकृत/खासगी बँक ३० कोटी ३५ कोटी १७ लाख १,९९५ 
एकूण ६५ कोटी ६६ कोटी ३८ लाख ७,९५४  

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exceed the loan disbursement target in yevala nashik marathi news