शेतकरी हतबल.. पावसामुळे महागाचे बियाणे पाण्यात..कांद्याचे रोप तयार करणे ठरणार महागडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

गेल्या दोन-चार दिवसांपासून तालुक्‍यात रोजच पाऊस हजेरी लावत असल्याने पोळ कांद्यासाठी टाकलेल्या कांदा बियाण्या (उळे)च्या उगवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. यामुळे "महागाचे बियाणे पाण्यात' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

नाशिक / देवळा : कसमादे भागात खरीप हंगामात पोळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ कांदा खराब झाला किंवा त्याची टंचाई निर्माण झाली तर हा कांदा चांगले पैसे देऊन जातो हा शेतकऱ्यांचा दर वर्षीचा अनुभव आहे. त्यासाठी दर वर्षी जून-जुलै महिन्यात कांदा उत्पादक शेतकरी कांदा बियाणे पेरणी करत रोप तयार करतात.

दहा ते बारा हजारांचे बियाणे वाया

यंदाही अनेक शेतकऱ्यांनी कांद्यांसाठी शेते मोकळी ठेवत कांदा बियाणे पेरणी केली. मात्र पावसाची रोजच जोरदार हजेरी लागत असल्याने या उळ्याच्या उगवणक्षमतेवर परिणाम झाला आहे, तर काहींचे सडू लागले आहे. कांदारोप तयार करतेवेळी प्रमाणात पाणी असणे गरजेचे असते. आधीच दहा ते बारा हजार रुपये पायलीचे महागाचे उळे खरेदी करत ते शेतात टाकले आहे. परंतु पावसाने त्याची लय बिघडवून टाकल्याने नवीन उळे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​

शेतकऱ्याची अवस्था अवघड

एकीकडे कांद्याला भाव नाही अन्‌ दुसरीकडे उळे इतके महाग! त्यात पावसामुळे उळे खराब होऊ लागल्याने शेतकऱ्याची अवस्था अवघड झाली आहे. शासनाने कांद्याची भाववाढ करून दिलासा द्यावा. -समाधान पगार, खडकतळे, ता. देवळा 

यंदा कांद्याचे रोप तयार करणे ठरणार महागडे

जूनच्या सुरवातीपासून मोठ्या प्रमाणात व रोजच पडणाऱ्या पावसाने खरीप कांद्याचा हंगाम उद्‌ध्वस्त केला आहे. दहा-बारा हजार रुपये पायलीचे कांद्याचे रोप पावसामुळे रोगट झाले आहे, पावसामुळे यंदा कांद्याचे रोप तयार करणे महागडे ठरणार आहे. -दत्ता मराठे, शेतकरी, मेशी 

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expensive seeds waste in water due to rains nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: