राज्यात ३० लाख टनांपर्यंत द्राक्षउत्पादन अपेक्षित; नोंदणीसाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

३० नोव्हेंबरअखेर राज्यातील ३१ हजार ३५३ हेक्टर क्षेत्राची नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक, सांगली, पुणे, सातारा, नगर जिल्ह्यात बागांच्या नोंदणीचे काम चांगले झाले असून, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, जालना जिल्ह्यात आणखी नोंदणी होणे अपेक्षित असल्याने नोंदणीसाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाशिक : निर्यातक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेसाठी गुणवत्तापूर्ण द्राक्षांच्या उत्पादनासाठी ग्रेप नेट ऑनलाइन प्रणालीद्वारे द्राक्षबागांची नोंदणी केली जाते. ३० नोव्हेंबरअखेर राज्यातील ३१ हजार ३५३ हेक्टर क्षेत्राची नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक, सांगली, पुणे, सातारा, नगर जिल्ह्यात बागांच्या नोंदणीचे काम चांगले झाले असून, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, जालना जिल्ह्यात आणखी नोंदणी होणे अपेक्षित असल्याने नोंदणीसाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

२० डिसेंबरपर्यंत नोंदणीला मुदतवाढ

द्राक्षबागांच्या क्षेत्राच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात बागांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी प्रयत्न झाले आहेत. यंदाचे ऑनलाइन नोंदणीचे वैशिष्ट्य म्हणजे, द्राक्ष उत्पादकांशी संपर्क साधून ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची मोहीम कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नोडल अधिकाऱ्यांना द्राक्ष उत्पादकांशी संपर्क साधून वाढलेल्या मुदतीमध्ये आणखी बागांची नोंदणी करण्याच्या सूचना कृषी विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार यंदा ४० हजार हेक्टरपर्यंत बागांची ऑनलाइन नोंदणी होण्याचा अंदाज निर्यात विभागाचे तांत्रिक सल्लागार गोविंद हांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले, की निर्यातीसाठी द्राक्षबागांची नोंदणी महत्त्वाची आहे. त्याच वेळी देशांतर्गत ग्राहकांना गुणवत्तेची हमी ऑनलाइन नोंदणीच्या प्रमाणपत्रातून देणे शक्य आहे. त्यादृष्टीने अधिकाधिक शेतकऱ्यांनी द्राक्षबागांची ऑनलाइन नोंदणी करणे महत्त्वाचे आहे.

‘अर्ली’ द्राक्षांचे नुकसान

‘अर्ली’ बागांची छाटणी करून विशेषतः परदेशी बाजारपेठेत पाठविल्या जाणाऱ्या द्राक्षांचे यंदा पावसाने नुकसान केले. सर्वसाधारपणे राज्यातील अडीच लाख एकर क्षेत्रापैकी १० टक्के बागांचे नुकसान पावसाने केल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. हेक्टरी सर्वसाधारपणे २४ टनांपर्यंत शेतकरी द्राक्षांचे उत्पादन घेतात. निसर्गाने यंदा साथ दिलेली नसतानाही शेतकऱ्यांनी यंदा द्राक्षबागांची जोपासना चांगली केली असल्याने निर्यात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. द्राक्षांची निर्यात वाढण्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. देशात फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी ग्रेप नेट ऑनलाइन प्रणालीमध्ये द्राक्षबागांची नोंदणी केली आहे. त्यात कर्नाटकमधील १६७ हेक्टरचा समावेश आहे. वाढविलेल्या मुदतीत कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीच्या अभियानाला अधिक गती दिल्यास ५० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र नोंदणीकृत होऊ शकेल.

जिल्हानिहाय नोंदणी (आकडे हेक्टरमध्ये)

नाशिक : २६ हजार २०७
सांगली : २ हजार ९२४
पुणे : १ हजार ८६
सातारा : ४३३
नगर : ३४३
उस्मानाबाद : ११२
लातूर : १०६
सोलापूर : ७६
बुलडाणा : ४८
जालना : १६
बीड : १

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension till December 20 for registration of vineyards nashik marathi news