नको औत.. नको बैलजोडी.. अशी करू कोळपणी..! शेतकऱ्यांची भारी आयडीया

भगवान हिरे : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 9 जुलै 2020

कपाशीची कोळपणी करायची... पण बैलगाडी नाही... बाजारात बैलगाडीच्या किमती 70 हजारांपासून एक लाखापर्यंत आहेत. पुन्हा जोडीसाठी वर्षभर चारापाण्याचा खर्च करायचा. औत रोजाने आणावे तर सर्वांचीच लगबग सुरू असल्याने तेही भेटेना मग दोन शेतकऱ्यांनी केली अशी शक्कल..

नाशिक/ साकोरा : कपाशीची कोळपणी करायची...पण बैलगाडी नाही... बाजारात बैलगाडीच्या किमती 70 हजारांपासून एक लाखापर्यंत आहेत. पुन्हा जोडीसाठी वर्षभर चारापाण्याचा खर्च करायचा. औत रोजाने आणावे तर सर्वांचीच लगबग सुरू असल्याने तेही भेटेना मग दोन शेतकऱ्यांनी केली अशी शक्कल..

जाटपाडेच्या शेतकऱ्यांची शक्कलच न्यारी 

बैलजोडी असल्याशिवाय कोणत्याही पिकाची पेरणी करता येणे शक्‍य नसताना जाटपाडे (ता. मालेगाव) येथील शेतकरी नानाभाऊ मान व दीपक जिंजर यांनी आपल्या दुचाकीमागे त्या मापाचे कोळपणीयंत्र बनवून कोळपणी केली. बैलजोडी बाजारात घ्यायला गेलो होतो. तिची किंमत 70 हजार ते एक लाखापर्यंत होती.बैलजोडी घेऊन तिचे पालनपोषण करण्यासाठी एक मनुष्य व चारापाणी लागणार हा विचार करून बैलजोडी परवडणारी नाही म्हणून घरी येऊन दुचाकीच्या मापाचे कोळपणीयंत्र बनवून चार एकर कोळपणी केली. या यंत्रामुळे माझा खर्च व वेळही वाचला आणि चार एकरची कोळपणी चांगल्या प्रकारे झाली. बैलजोडीने कोळपणी केल्यास पाचशे रुपये एकर याप्रमाणे चार एकरसाठी दोन हजार रुपये लागले असते. मात्र दुचाकीच्या सहाय्याने चार एकरसाठी अवघे चारशे रुपये लागले. दुचाकीचे कोळपी बनविण्यासाठी 1500 रुपये खर्च आला.

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!

360 रुपयांत कोळपणी 

बैलजोडी महाग असल्यामुळे मी ती विकत घेऊ शकलो नाही. भाडोत्री औत पण मिळाले नाही म्हणून दुचाकीचे कोळपणीयंत्र बनविले. त्यासाठी एकरी एक लिटर पेट्रोल व एक तास वेळ अशा प्रकारे 360 रुपयांत माझी चार एकर कपाशी पिकाची कोळपणी झाली. -नानाभाऊ मान 

शेतकरी, जाटपाडे कपाशी पिकात दुचाकी बांधावर फिरवताना कसरतीने एकही रोप न मोडता मी दुचाकी वळवत होतो. ओळीत दुचाकी चालवणे ही पण एक कसरत आहे. त्रास झाला. मात्र आमचा वेळ आणि पैसे वाचले. 
दीपक जिंजर, जाटपाडे 

हेही वाचा > पहाटेची वेळ...जुना वाडा कोसळतो तेव्हा.. अंगावर काटा आणणारी दुर्घटना..!

बैलजोडीचे कोळपणी यंत्रापेक्षा कमी खर्चात दुचाकीचे यंत्र बनविले. हे यंत्र शेतकऱ्याला कमी खर्चात उपयोगी आले. ते यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे. -बाली सोनवणे, मल्हारवाडी, नांदगाव 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer idea of farming due to lockdown nashik marathi news