
या वर्षी कांद्याच्या क्षेत्रात जरी वाढ झाली असली तरी या पिकावरील संकटामुळे उत्पादनात घट होईल, असे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
खामखेडा (नाशिक) : लागवड केलेल्या उन्हाळ कांद्यावर मोठ्या प्रमाणावर मररोगाचा प्रादुर्भाव असल्याने खामखेडा येथील शेतकरी समाधान आहेर यांनी पाच एकरांत लागवड केलेल्या कांदा पिकात मेंढ्या सोडून संताप व्यक्त केला.
कांदा पिकात मेंढ्या सोडून शेतकऱ्याचा संताप
चालू वर्षी उन्हाळ कांद्याचे रोप उशिराच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर खराब झाले. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला दुबार, तसेच तिबार कांदा रोप टाकण्याची वेळ आली. त्यामुळे या वर्षी उन्हाळ कांद्याच्या काळ्या रोपास प्रचंड मागणी झाली. जवळपास पाच हजार रुपये किलो दराने बियाणे विकले गेले. या वर्षी महागडे बियाणे टाकत अनेक शेतकऱ्यांनी काळजी घेत कांदा लागवड केली. नोव्हेंबर तसेच डिसेंबरच्या सुरवातीची लागवड झालेले कांदा पीक मोठ्या प्रमाणावर असून, जवळपास अनेक शेतकऱ्यांच्या ४० ते ५० टक्क्यांपर्यंत लागवड केलेल्या कांद्याची मर झाली. त्यामुळे पातळ झालेला कांदा व या पिकास उत्पादन खर्च वाढेल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कांद्यावर रोटर फिरविला.
हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड
बदलत्या हवामानामुळे मररोगाचा प्रादुर्भाव
खामखेडा येथील प्रगतिशील शेतकरी समाधान आहेर यांनी नोव्हेंबरमध्ये लागवड केलेल्या साडेपाच एकर क्षेत्रात संतापाने मेंढ्या चरायला सोडल्या.
सततचे बदलते हवामान, तसेच खराब कांदारोपाला जमिनीतील बुरशीमुळे लागवड केलेल्या कांद्याच्या मर होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या वर्षी कांद्याच्या क्षेत्रात जरी वाढ झाली असली तरी या पिकावरील संकटामुळे उत्पादनात घट होईल, असे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला
मी दर वर्षी ३५ ते ४० एकरांवर कांदालागवड करतो. नोव्हेंबरमधील लागवड झालेल्या पाच एकर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मर असल्याने उत्पादन खर्च वाढेल म्हणून आज पिकात मेंढ्या सोडत पीक नष्ट केले. -समाधान आहेर, कांदा उत्पादक शेतकरी, खामखेडा