मालेगावला कांदा निर्यातबंदीच्या अध्यादेशाची अंत्ययात्रा; शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारचा निषेध

प्रमोद सावंत
Monday, 21 September 2020

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना शेती विकासाचे स्वप्न दाखवून पुन्हा सत्तेत आले. सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी राहिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे मालेगाव तालुध्यक्ष चंद्रकांत शेवाळे यांनी केला.

नाशिक/मालेगाव : गेल्या महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होण्यास सुरवात झाली असता केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लादून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदीचा निषेध करुन सदर आदेशाची सोमवारी (ता.21) अंत्ययात्रा काढण्यात आली. केंद्र शासनाच्या निषेधार्थ प्रातिनिधिक स्वरुपात तिरडी मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला, तसेच तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना निवेदन देण्यात आले. 

शासनाच्या धोरणाविरुध्द शेतकऱ्यांच्या संतप्त भावना

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना शेती विकासाचे स्वप्न दाखवून पुन्हा सत्तेत आले. सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी राहिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे मालेगाव तालुध्यक्ष चंद्रकांत शेवाळे यांनी केला. तिरडी अंत्ययात्रेला सटाणा नाका भागातून सुरवात झाली तर सटाणा रोड, साठफुटी रस्त्यावरुन तिरडी मोर्चा तहसीलदार कार्यालयावर पोचला. या ठिकाणी पोलिसांनी मोर्चा अडविला. यावेळी शासनाच्या धोरणाविरुध्द शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच तालुकाध्यक्ष शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले. केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी आदेश त्वरित मागे घ्यावा. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय त्वरित दूर करून न्याय मिळवून द्यावा अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा - VIDEO : "मराठा आरक्षणाला विरोध करणारी राज्यातील मंत्र्यांची लॉबी सक्रीय" - आमदार विनायक मेटे

तिरडीस खांदा देऊन अंत्ययात्रा

तिरडी मोर्चात प्रतिनिधिक स्वरूपात शेतकरी ट्रॅक्टरवर गळफास लावून आत्महत्या करीत असल्याचे दाखविण्यात आले. मोर्चाच्या अग्रभागी चार शेतकऱ्यांनी तिरडीस खांदा देऊन अंत्ययात्रा काढली तर अंत्ययात्रेच्या पुढे एक शेतकरी मडके घेऊन चालत होता. मोर्चात कांदा उत्पादक शेतकरी नरेंद्र शेवाळे, मधुकर शेवाळे, विरकुमार शेवाळे, संदीप शेवाळे, योगेश शेवाळे, अरुण शेवाळे, जितेंद्र शेवाळे, रणजित शेवाळे, पंकज हिरे, प्रभाकर शेवाळे, ॲडव्होकेट चंद्रशेखर शेवाळे आदींसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. उपअधीक्षक मंगेश चव्हाण, छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाडिले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा - वरुणराजाच्या हजेरीची शंभरी पार! नाशिक- पूर्व पट्ट्याला अतिवृष्टीचा दणका

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers agitation to lift ban on onion exports nashik marathi news