VIDEO : "मराठा आरक्षणाला विरोध करणारी राज्यातील मंत्र्यांची लॉबी सक्रीय" - आमदार विनायक मेटे

दत्ता जाधव
Monday, 21 September 2020

काँग्रेस, राष्टवादी काँग्रेसमधील प्रस्थापित मराठा नेत्यांना आरक्षणाची काहीही गरज नाही, खरी गरज समाजातील अल्प उप्तन्न गटातील गरीब वर्गाला आहे. मात्र या आरक्षणाला विरोध करणारी राज्यातील मंत्र्यांची लॉबी पुन्हा सक्रीय झाल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी आज नाशकात केला. 

नाशिक : काँग्रेस, राष्टवादी काँग्रेसमधील प्रस्थापित मराठा नेत्यांना आरक्षणाची काहीही गरज नाही, खरी गरज समाजातील अल्प उप्तन्न गटातील गरीब वर्गाला आहे. मात्र या आरक्षणाला विरोध करणारी राज्यातील मंत्र्यांची लॉबी पुन्हा सक्रीय झाल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी आज (ता.२१) नाशकात केला. 

मुख्यमंत्रीही शब्द पाळत नाहीत : विनायक मेटे 
मराठा समाजाला देण्यात आलेल्या शैक्षणिक व नोक-यांमधील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सकल मराठा समाजातर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत काल समन्वयकांकडून पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदनही सादर करण्यात आले. आरक्षणाबाबत समाजात संभ्रमावस्था असून त्याबाबत आज मेटे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत सद्याचे मुख्यमंत्री व सरकार शब्द पाळत नसल्याचा आरोप केला. 

हे सरकार आरक्षणाच्या स्थगितीचीच वाट पाहतय - मेटे
राज्यातील विद्यमान आघाडी सरकारकडून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर राज्यात नोकरभरती सुरू करण्यात आली आहे, याकडे लक्ष वेधत मेटे यांनी म्हणजेच हे सरकार आरक्षणाच्या स्थगितीचीच वाट पाहात असल्याचा आरोप केला. राज्यातील गृह व आरोग्य ही खाती दुर्दैवाने मराठा समाजातील नेत्यांकडेच असल्याचे सांगून सरकार व त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्यांनी समाजाच्या जखमेवर मीठ चोळणे थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली. या सरकारवर नेमका दबाव कोणाला हेच समजेनासे झाल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

शिवसेना आरक्षण विरोधी 
राज्यातील सत्तारूढ शिवसेनेचा पूर्वीपासूनच आरक्षणाला विरोध राहिला आहे, असा आरोप करून श्री. मेटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ ऐकून घेतात, पण कृती मात्र काहीच करत नाहीत, हे सांगताना बाळासाहेब ठाकरे ऐकणारे व शब्द पाळणारे होते. दोन दिवसात सारथीचे काम सुरू होईल, असे सांगण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात अद्यापही ते सुरू झालेले नाही, याकडे श्री.मेटे यांनी लक्ष वेधले. 

पालकमंत्री भुजबळ आरक्षणाला अनुकूल 
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ कायम मराठा आरक्षणाच्या बाजूनेच राहिले, त्यामुळेच शिवसेनेने त्यांची हकालपट्टी केली, असे सांगून श्री. मेटे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर माजी मंत्री शालिनीताई पाटील व आपल्यालाही टारगेट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

...मग आंदोलन कोणाविरोधात 
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मग राज्यात सुरू असलेले आंदोलन नेमके कोणाविरोधात आहे? याप्रश्‍नावर लोकशाही पद्धतीने सुरू असलेले हे आंदोलन राज्य सरकारविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. आश्‍वासन देऊनही सरकार पाळत नसल्याने राज्यभरातील आंदोलनाची धग वाढत असल्याचे ते म्हणाले. 

शहरातील कोरोना मृत्यूदर लाजीरवाणा 
देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात कोरोना प्रादुर्भावाचा दर शहरात मृत्युचा दर सर्वाधिक असून हे प्रशासन, आरोग्ययंत्रणेसाठी अतिशय लाजीरवाणे आहे. याप्रश्‍नी शासन काही करेल याभ्रमात न राहता नागरिकांनी स्वतःहून दहा दिवसांचा जनता कर्फ्यु स्वयंःस्फुर्तीने पाळावा, असे आवाहनही  मेटे यांनी केले. 

संपादन  - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lobby of state ministers opposed to Maratha reservation said by vinayak mete