
सिन्नर(नाशिक) : शेतात अहोरात्र परिश्रम करणारे शेतकरी आणि सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा करणारे सैनिक यांच्यामुळे देश सुरक्षित आहे. प्रगतीची भाषा करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने या घटकांकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा जय जवान जय किसान या घोषणेची आठवण करून देण्यासाठी गरज पडल्यास दिल्लीकडे कूच करू, असा इशारा आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिला.
दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनास पाठींबा दर्शवण्यासाठी आमदार कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. ७) सिन्नर तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर उपस्थित शेतकरी व कार्यकर्ते यांना त्यांनी संबोधित केले. देशात ८० लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे. आपल्याला प्रत्येकाला शेतकरी असल्याचा अभिमान असला तरी बळीराजाची होणारी हेळसांड आपण अकारण सहन करत आहोत. उत्पादित केलेल्या शेतीमालास हमीभाव मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केंद्रातील विद्यमान सरकारने सुधारित कृषी विधेयकांच्या माध्यमातून भांडवलदार वर्गाचे हित जोपासल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.
देशव्यापी बंदमध्ये सिन्नरचे शेतकरी देखील सहभागी
कापूस एकाधिकार योजना, मका, सोयाबीन, हरभरा पिकांसाठी असणाऱ्या खरेदी योजना अभ्यासल्या तर शेतकऱ्यांना न्याय कुठेच मिळत नाही. केंद्राचे नवीन कायदे अन्यायकारक असून शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्यावर दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न आहे. गेल्या १० दिवसांपासून दिल्लीतल्या रस्त्यांवर शेतकऱ्यांनी ठाण मांडले आहे. त्यांच्या मागण्यांची पूर्तता करायला सरकार अनुकूल नाही. राज्यातील महाविकास आघाडी दिल्लीतील आंदोलकांसोबत आहे. कारण प्रश्न ठराविक प्रांतातील शेतकऱ्यांचा नसून महाराष्ट्र आणि देशातील शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये सिन्नरचे शेतकरी देखील सहभागी होतील. खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, याकडे कोकाटे यांनी लक्ष वेधले.
बैलगाड्या घेऊन शेतकऱ्यांचा सहभाग
आडवा फाटा येऊन बसस्थानक, वावीवेस मार्गे काढलेल्या मोर्चात बैलगाड्या घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, किसान सभेचे नाशिक तालुकाध्यक्ष नामदेव बोराडे, बाजार समिती सभापती लक्ष्मण शेळके, उपसभापती संजय खैरनार, जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती गटनेते विजय गडाख, रविंद्र पगार, योगिता कांदळकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.