शेतकऱ्याचा विदारक अनुभव! मेथीला भाव म्हणून पेरली मेथी; मात्र पदरी फक्त तोटाच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

सध्या मेथीला भाव नसल्याने व्यापारी वर्ग मेथीची भाजी घ्यायला टाळाटाळ करत असून, अनेक शेतकऱ्यांना या मेथीचे करावे काय, असा प्रश्न पडला आहे. याचा विदारक अनुभव विखरणीचे शेतकरी जनार्दन शेलार यांनी घेतला.

येवला (नाशिक) : महिन्यापूर्वी २५ ते ३० रुपयांना मेथीची जुडी विक्री होत असल्याने तालुक्यातील मोठ्या क्षेत्रावर मेथीचे पीक तरारलेले. मात्र सध्या मेथीला भाव नसल्याने व्यापारी वर्ग मेथीची भाजी घ्यायला टाळाटाळ करत असून, अनेक शेतकऱ्यांना या मेथीचे करावे काय, असा प्रश्न पडला आहे. याचा विदारक अनुभव विखरणीचे शेतकरी जनार्दन शेलार यांनी घेतला.

तो प्रयोगही घाट्यातच

श्री. शेलार यांना मेथी पिकवायला चार हजार ४०० रुपये खर्च आला. मात्र भाजी विकून त्यांच्या हातात पडले केवळ दोन हजार ९५० रुपये. यातून श्री. शेलार यांना तब्बल एक हजार ४५० रुपयांचा तोटा सहन करावा लागला. एकीकडे कांद्याची निर्यातबंदी असल्याने कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टीने कांद्याची ७० टक्के रोपे खराब झाली आहेत. त्यामुळे कांदा लागवडीसाठी ठेवलेली जमीन तशीच पडून असल्याने शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. पण हा प्रयोगही घाट्यात चालला असून, भाजी लिलावात बेभवात विकली जात आहे.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

विखरणीचे शेतकरी जनार्दन शेलार यांनी आपल्या शेतात दहा गुंठे भाजी केली होती. भाजीलागवडीपासून, बियाणे खरेदी, मजुरी, गाडीभाडेपासून विक्रीसाठी नेईपर्यंत त्यांना चार हजार ४०० रुपये खर्च आला व भाजी विकून त्यांच्या हातात पडले केवळ दोन हजार ९५० रुपये. एक ते दीड महिना कुटुंबातील सदस्यांसह काबाडकष्ट करून मोठ्या कष्टाने भाजी पिकवली. आता त्यातून चार पैसे मिळतील, या आशेपोटी भाजी विक्रीला नेली. मात्र त्यातून त्यांना एक हजार ४५० रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers also lost money for fenugreek crop nashik marathi news