इथे तर चक्क जलस्त्रोतांचे नैसर्गिक प्रवाहच बदलले! दिलं जातयं आपत्तीला निमंत्रण

PNH20A01940_pr.jpg
PNH20A01940_pr.jpg

नाशिक / पांढुर्ली : नैसर्गिक नदी, ओढे, नाले यांच्या प्रवाहाला कधी अडथळे निर्माण करून तर कधी थेट ओढे, नाले बुजवून मोठ-मोठ्या इमारतींचे अतिक्रमण झाल्याचे आपण बघत आलो आहोत. हे प्रकार प्रामुख्याने जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये होताना दिसतात. मात्र ग्रामीण भागातही आणि शेतीचा बांध किंवा रस्त्याच्या निर्मितीसाठी असे प्रकार घडू लागले आहेत. यामुळे चक्क जलस्त्रोतांचे नैसर्गिक प्रवाह मार्ग बदलून आपत्तीला निमंत्रण दिले जात आहे. असाच प्रकार निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेल्या सिन्नर तालुक्‍याच्या ग्रामीण भागात घडला आहे. काय आहे हा नेमका प्रकार.... 


शेतकरी धास्तावले 
सिन्नर तालुक्‍यातील शिवडे - सोनांबे रस्त्यावरील घाटात सध्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. शिवडे शिवारातील वनविभागाच्या हद्दीत हे काम सुरू असून खोदकाम तसेच ब्लास्टिंग करताना नैसर्गिक असलेले जलस्रोत, धबधबे, झरे, नाले, ओढे यांचे प्रवाह बदलून नवीन प्रवाह निर्माण झाले आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून या भागातील शेती आणि निसर्गसंपदा वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे. 


मुख्य वाहतुकीचा रस्ता धोकादायक 
समृद्धी कामामुळे काही ठिकाणी दगड - माती, गोटे यांचा भराव होऊन पाण्याचा मार्ग बदलला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसात हे सगळे सिद्ध झाले आहे. सोनांबे, खापराळे, कोनांबेच्या डोंगरदऱ्यातून येणारे हे पाणी सरळ शिवडेतील पाझर तलावात जाऊन मिळते. पाणी वहनासाठी मोठा नाला असून याच नाल्याच्या दोन्ही बाजूंनी विस्तीर्ण शेती क्षेत्र आहे. परंतु समृद्धी महामार्गाच्या कामातून जलमार्ग बदलल्याने शेती क्षेत्राबरोबरच शिवडे - सोनांबे मुख्य वाहतुकीचा रस्ता धोकादायक बनला आहे. 


मोठ्या पुलात रूपांतराची मागणी 
घाट उताराला असलेल्या नाल्यावरील पाणीवाहक मोरी शेजारी शेती आहे. याच मोरीतून यापूर्वी पाणी वाहत होते. परंतु प्रवाहमार्ग बदलल्याने मोरीतून पाणी वाहण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळेच मोरी वरून जाणे येणे पावसाळ्यात शक्‍य राहणार नाही. तसेच आजूबाजूचे शेती क्षेत्रही पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्यावरील लहान मोरीचे मोठ्या पुलात रूपांतर करण्याची मागणी केली आहे. 


विद्यार्थ्यांचीही कायम वर्दळ 
शेतकऱ्यांच्या मते हा प्रश्न केवळ शेतीच्या नुकसानीचा नसून अपघात घडून जीवितहानीही होऊ शकते. या रस्त्यावरून वाहनांच्या वर्दळीबरोबरच शाळकरी मुलांचीही ये - जा कायमस्वरूपी असते. या मोरीच्या सुधारणेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी लवकरात लवकर ठोस उपाययोजना करावी, समृद्धीमुळे बदललेल्या प्रवाह मार्गाची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com