तीन तासांची प्रतीक्षा अन् शेतकऱ्यांचे समाधान..! वाचा सविस्तर 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

यूरिया व्यापाऱ्यांना तंबी दिल्यानंतरही लिंकिंग किंवा जादा दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. कृषी विभागाने पुढाकार घेतल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिक / मालेगाव : राज्यात ९० टक्के पेरण्या झाल्याने सर्वत्र यूरियाची मागणी वाढली. कोरोना संसर्गात अडचणी आल्याने यूरिया वेळेवर उपलब्ध होऊ शकला नाही. यूरियाची टंचाई जाणवताच मागणी वाढली. विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची लूट, लिंकिंग, वाढीव दराने यूरिया विक्री सुरू केली. मालेगाव तालुक्यासाठी पाच हजारांहून अधिक टन यूरिया उपलब्ध होऊनही साठेबाजी व काळा बाजारामुळे कसमादे परिसरात यूरियाची टंचाई जाणवू लागली. अखेर बफर स्टॉक खुला करण्यात आला. आणि मग...

यूरिया मिळाल्याचे समाधानच मोठे 

शुक्रवार ते सोमवार साप्ताहिक सुटीचा रविवार वगळता तीन दिवसांत येथील एक हजार ७८० शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन गोणी यूरिया विक्री केल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे उपलब्ध झालेला दोनशे टन यूरिया तीन दिवसांत हातोहात विक्री झाला. शेतकऱ्यांना दोन गोणीसाठी तीन तास रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागली. मात्र २६६ रुपयांची गोणी हा रास्त दर व दोन गोणी का होईना कुठलेही औषध लिंकिंगमध्ये खत वा बियाणे खरेदी न करता यूरिया मिळाला, हे समाधानच त्यांच्यासाठी मोठे होते. येथील बाजार समितीजवळील खाद्य महामंडळाच्या गुदामामधून प्रत्येक शेतकऱ्याला एका आधारकार्डवर दोन गोणी यूरिया वाटप करण्यात आला.

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

पोलिस बंदोबस्तात यूरिया वाटप

यूरिया खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात यूरिया वाटप करण्यात आला. कृषी विभाग व मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन टेबल थाटून प्रत्येकी दोन गोणी याप्रमाणे यूरिया वाटप केला. जिल्ह्याला ४९ हजार ६८ टन यूरिया उपलब्ध होऊनही जिल्ह्यातील किमान तीन ते चार तालुक्यांत टंचाई निर्माण झाली आहे. यूरिया व्यापाऱ्यांना तंबी दिल्यानंतरही लिंकिंग किंवा जादा दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. कृषी विभागाने पुढाकार घेऊन महामंडळातर्फे बफर स्टॉक खुला करत यूरिया उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are satisfied with the availability of urea malegaon nashik marathi news