काकडीच्या भावाचे मातेरे, 20 किलोची जाळी 35 रुपयांना! बळीराजाची उपेक्षा थांबता थांबेना

अजित देसाई
Friday, 20 November 2020

मातीमोल दरात काकडीची खरेदी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. नाशवंत माल असल्याने व शेतात अधिक काळ पीक ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होते. आज मिळणारा कवडीमोल भाव बघता काढणी आणि वाहतूक खर्च देखील सुटत नाही.

सिन्नर (नाशिक) : घराघरात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या काकडीच्या भावाचे अक्षरशः मातेरे झाले. सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात उत्पादित होणाऱ्या काकडीला प्रती 20 किलोसाठी अवघा 35 रुपये भाव मिळतो आहे. बाजारात 20 ते 25 रुपयांना विकल्या जाणाऱ्या काकडीला घाऊक खरेदीदारांकडून नीचांकी मोबदला दिला जात असल्याने बळीराजाची उपेक्षा थांबायला तयार नसल्याचे चित्र आहे.

खिरा जातीची काकडी लागवड इतिहास जमा

सध्या काकडीचा हंगाम जोरात सुरू असून सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात शेते बहरली आहेत. एकरी उत्पादन खर्च लाखाच्या घरात आणि हातात पडणारे उत्पन्न मात्र काही हजारातच अशी अवस्था काकडी उत्पादक शेतकऱ्याची आहे. पांढुर्ली, शिवडेचा परिसर संपूर्ण जिल्ह्यात दर्जेदार काकडी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागात परंपरागत पिकांमध्ये काकडीचा समावेश असून खिरा या नावाने येथील काकडी परिचित आहे. ब्रिटिश काळापासून शिवडेत उत्पादित होणाऱ्या काकडीला राजधानी मुंबईत हक्काची बाजारपेठ आहे. या भागात दररोज असंख्य वाहनांमधून मुंबईच्या दिशेने काकडीची वाहतूक केली जायची. मात्र, गेल्या काही वर्षांत पीकपद्धती बदलली तशी खिरा जातीची काकडी लागवड इतिहास जमा झाली. त्याऐवजी संकरित, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड करण्याकडे या भागातील शेतकरी वळला.

शेतकऱ्यांना काकडीने झटका दिल्याचे चित्र

पूर्वी लांबसडक भोपळ्याच्या आकाराची असणारी काकडी आता चार ते पाच इंच आकारात उपलब्ध व्हायला लागली. परिणामी जमिनीवर पसरत जाणाऱ्या वेल तार-बांबूच्या आधाराने वाढू लागली. उत्पादन खर्च काहीसा वाढला असला तरी लुसलुशीत हिरवा रंग ग्राहकांना आकर्षित करणारा आल्याने वरकड उत्पन्न देखील मिळू लागले. पूर्वीच्या पध्दतीत काकडी लागवडीचा खर्च काहीसा कमी होता. त्यावेळी केवळ घरगुती बियाणे वापरले जायचे. तर आता बियाणे बाहेरून विकत घ्यावे लागते. इतर खर्च पाहता एकरी लाखभर रुपये तरी शेतकऱ्याला गुंतवावे लागतात. बाजारभाव स्थिर राहिल्यास हा खर्च सहजपणे वसूल होतो. परंतु सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना काकडीने झटका दिल्याचे चित्र आहे.

व्यापारी काकडी 12-15 रुपयांला विकून नफा मिळवताय...

400 ते 450 रुपयांच्या घरात असणारी 20 किलोची जाळी थेट 35 ते 40 रुपयांवर घसरली असून निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेणारा शेतकरी उधवस्थ झाला आहे. मातीमोल दरात काकडीची खरेदी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. नाशवंत माल असल्याने व शेतात अधिक काळ पीक ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होते. आज मिळणारा कवडीमोल भाव बघता काढणी आणि वाहतूक खर्च देखील सुटत नाही. शेतात पिकवलेला माल कमी किमतीत विकताना शेतकरी घाटयात असतो. तर व्यापारी मात्र हीच काकडी 12-15 रुपयांच्या घरात विकून नफा कमवतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are suffering due to fall in cucumber prices nashik marathi news