शेतकरी सापडतोय सावकारीच्या मगरमिठीत!...'कॅश क्रेडिट'वर रेट ठरलेला..

farmer1.jpg
farmer1.jpg
Updated on

नाशिक : पीककर्जाचा तिढा गच्च राहिल्याने खरिपासाठी लागणारे बियाणे, खतांसाठी कृषिपंढरी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सावकारीच्या मगरमिठीमध्ये गुरफटत चाललेत. पंधरा महिन्यांच्या उधारीवर माल घ्यायचा म्हटले, की पिशवी-गोणीमागे शंभर ते दीडशे रुपये अधिकचे मोजावे लागतात. एवढेच नव्हे, तर कंपन्यांनी बॅंकेत पैसे भरल्याखेरीज निविष्ठा देणे बंद केल्याने 12 टक्‍क्‍यांनी "कॅश क्रेडिट'वर धंदा करणाऱ्या दुकानदारांचा 15 ते 20 टक्‍क्‍यांचा "रेट' ठरलेला आहे. 

तर पीक कसे येणार?

अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील अशोक महादू आढाव हे सात एकरांचे मालक. पाणी कमी असल्याने उन्हाळ कांद्याचे उळे खराब झाले आणि आर्थिक दणका बसला. त्यांचे स्वतःचे जिल्हा बॅंकेत 80 ते 90 हजार रुपये अडकलेत. मग आता खरिपाचे काय करायचे म्हणून त्यांनी ओळखीतून 15 टक्के व्याजदराने 25 हजार रुपये घेतले. या पैशातून त्यांनी तुरीचे नऊ किलो बियाणे आणून तीन एकरांवर पेरणी केली. तीन एकरांसाठी मक्‍याच्या आठ पिशव्या बियाणे आणले. त्याची लागवड सुरू आहे. उरलेल्या एकरामध्ये त्यांना कांद्याची लागवड करायचीय. वेळेत बियाणे लावले नाही, तर पीक कसे येणार? म्हणून हे धाडस केलेय. खतासाठी पुन्हा उचल करण्याची वेळ येणार आहे. श्री. आढाव यांच्याकडून हे सारे ऐकताना काळीज पिळवटून निघत होते. काळ्या आईच्या सेवेतून जगण्यासाठीच्या धडपडीत कर्जबाजारीपणा शेतकऱ्यांच्या नशिबी व्यवस्था आणत असल्याचे स्पष्ट होते. 

महिन्याला 5 टक्‍क्‍यांचा खासगीचा दर
 
निमोण (ता. चांदवड) येथील नागेश आहेरांची व्यथा निराळी. साठ हजार रुपये खर्चून उत्पादित केलेल्या शंभर क्विंटल कांद्याला तीनशे ते साडेतीनशे रुपये क्विंटल असा भाव मिळाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यातच आता त्यांना खरिपासाठी पीककर्ज मिळाले नाही. मग त्यांनी दुकानदारांकडून उधारीवर बियाणे आणले. दोन एकरांतील मक्‍याच्या लागवडीसाठी साडेतेराशे रुपयांच्या तीन पिशव्या बियाणे घेतले. ढोबळी मिरची आणि टोमॅटोच्या प्रत्येकी 20 गुंठ्यांसाठी साडेनऊ हजार रुपयांचे बियाणे, पाच हजार रुपयांचे मल्चिंग केले. 20 गुंठ्यांच्या मुगासाठी साडेपाचशे रुपयांची एक बियाण्याची पिशवी घेतली. भुईमुगाची 20 गुंठ्यांवर 800 रुपये पायलीप्रमाणे दोन पायली बियाणे घेतले. 20 गुंठ्यांसाठी बाजरीला साडेपाचशे रुपयांच्या दोन पिशव्या बियाणे आणले. पाच गुंठ्यांत कांद्याची रोपे टाकली आहेत. ही सारी उधारी आठ दिवसांच्या बोलीवर केली असल्याने महिन्याला 5 टक्‍क्‍यांप्रमाणे व्याजाने कर्ज घेण्यासाठी ओळखीची व्यक्ती त्यांना चार दिवसांपासून फिरवते आहे. आज, उद्या आणि आता परवा असा निरोप मिळाला. 

सरकारच्या धोरणावर खत अवलंबून 

रेडगाव (ता. चांदवड) येथील सुधाकर काळे यांनी तीन एकरांवर सोयाबीन, एक बिघ्यात भुईमूग, अर्ध्या बिघ्यात मुगाची लागवड करण्यासाठी घरचे बियाणे वापरले आहे. कर्ज मिळाले नसल्याने दुकानदाराला रोख पैसे द्यायला नसल्याने घरच्या बियाण्यावर यंदाचा खरीप ते साजरा करताहेत. खताचे काय करणार, या प्रश्‍नावर श्री. काळेंनी सरकारच्या धोरणावर खत अवलंबून असेल, असे उत्तर दिले. 

गहाण टाकलेलं सोनं सोडवता आलं नाही 

दरसवाडी येथील शांताराम बागल यांच्याशी बोलत असताना एकामागून एक संकटे येत असतानाही ते खंबीरपणे उभे असल्याची प्रचीती आली. स्वतःची आठ गुंठे आणि आजारी वडिलांची आठ एकर अशी शेती करण्यासाठी जिल्हा बॅंकेचे कर्ज घेतलेले असल्याने आता इतर बॅंकांमधून कर्ज मिळत नाही ही त्यांची व्यथा. शेतीसाठी त्यांनी सोने गहाण ठेवले होते तेही त्यांना सोडवता आलेले नाही. त्यामुळे दहा हजारांपेक्षा अधिक किमतीचे मका आणि सोयाबीनचे बियाणे विकत घेताना त्याची किंमत आणि ब्रॅन्ड कशाला पाहायचा, असा प्रश्‍न त्यांचा आहे. सहा महिन्यांनी मका निघाल्यावर पैसे द्यायचे, असे सांगत असताना त्यांनी दिलेल्या माहितीतून पिशवीमागे शंभर रुपये अधिकचे बियाण्यासाठी द्यावे लागल्याचे स्पष्ट झाले. 

जिल्ह्यातील शेतीची स्थिती 

एकूण खरीप गावे --- 1 हजार 678 
खातेदार --- 8 लाख 44 हजार 565 
अल्पभूधारक --- 32 टक्के 
अत्यल्पभूधारक --- 45 टक्के 
खरिपासाठी पेरणीचे उद्दिष्ट --- 6 लाख 36 हजार हेक्‍टर 
पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट --- 3 हजार 303 कोटी (12 टक्‍क्‍यांपर्यंत पीककर्जवाटप झालेय) 
बियाण्याची गरज --- 97 हजार 685 क्विंटल 
खताची आवश्‍यकता --- 2 लाख 11 हजार 130 टन  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com