"काळी आई सांभाळ करी.." कोरोना विसरून शेतकरी राजा थेट शेतशिवारात!  

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 9 June 2020

आतापर्यंत कोरोनाला घाबरून घरात थांबलेल्या शेतकऱ्यांनी शेतीकामात झोकून दिले आहे. मका पेरणीसाठी महिला, मुले यांची मदत घेत पेरणीला वेग आला आहे. जिथे जास्त मजूर असेल तिथे मास्क लावत सावधगिरी बाळगली जात आहे. बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.​

नाशिक / देवळा : येथील कसमादे भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी कोरोनाला विसरून कामाला लागला आहे. खरीप हंगामातील मशागतीसह पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत कोरोनाला घाबरून घरात थांबलेल्या शेतकऱ्यांनी शेतीकामात झोकून दिले आहे.

काही भागात पेरणी सुरू

रोहिणी नक्षत्रातील निसर्ग चक्रीवादळादरम्यान आलेल्या पावसामुळे जमिनीची बऱ्यापैकी ओल झाली आहे. मृग नक्षत्रात पुन्हा दमदार पावसाची अपेक्षा असल्याने काही भागात पेरणी सुरू झाली आहे. ट्रॅक्‍टर व बैलांच्या सहाय्याने मक्‍याची पेरणी केली जात आहे. टोमॅटो, कोबी, मिरची, तूर व इतर भाजीपाल्यांची लागवड करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. अजून पुरेशी ओल नाही तिथे वखरणे, ढेकळे फोडणे, बांधबंदिस्ती करणे, शेणखत टाकणे ही कामे सुरू आहेत. 

हेही वाचा > भीतीदायक! दोघींना पकडून अंधारात खेचत नेले...भय इथले कधी संपणार?..

कोरोनाला विसरून शेतकरी शेतशिवारात  

मका पेरणीसाठी महिला, मुले यांची मदत घेत पेरणीला वेग आला आहे. जिथे जास्त मजूर असेल तिथे मास्क लावत सावधगिरी बाळगली जात आहे. बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. कळवण, देवळा व बागलाण तालुक्‍यांत कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे. मालेगावच्या ग्रामीण भागातही शेतीकामे सुरू आहेत.

हेही वाचा > वाहनांची वर्दळ कमी..तरीही जाताएत इतके जीव? दुष्टचक्र कधी संपणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers forgetting Corona going into farm nashik marathi news