esakal | ह्रदयद्रावक! जगाचा पोशिंदा...आणि सौभाग्याचं लेणंच तारण ठेवण्याची आली वेळ 
sakal

बोलून बातमी शोधा

farmer vanchit.jpg

 नगदी द्राक्ष पिकाची कोरोनामुळे धूळधाण झाली. यामुळे शेतकरी, सर्वसामान्यांनी घर खर्चासाठी आपल्याकडे असलेले सोने तारण ठेवण्यास सुरवात केली आहे. लॉकडाउनमध्ये ग्राहकांना सोने तारण कर्जाचे नूतनीकरणासाठी बॅंकांत येता न आल्याने लॉकडाउन शिथिल होताच आता बॅंकांमध्ये सोने तारणाकरीता गर्दी वाढू लागली आहे. 

ह्रदयद्रावक! जगाचा पोशिंदा...आणि सौभाग्याचं लेणंच तारण ठेवण्याची आली वेळ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सौभाग्याचं लेणंच तारण ठेवण्याची आली बळीराजावर वेळ 
सकाळ वृत्तसेवा 

नाशिक / पिंपळगाव बसवंत : लॉकडाउनमुळे तीन महिन्यांपासून अनेकांचा रोजगार बंद आहे. यातच कोरोनामुळे बळीराजाचे आर्थिक कंबरडे मोडले गेले. शेतपिकांसह द्राक्षांना देखील भाव न मिळाल्याने त्याच्यावर घर चालविणे अवघड होवून बसले. त्यामुळे अखेर जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजावर आता सौभाग्याचं लेणंच तारण ठेवण्याची आली आहे. त्यामुळे पिपंळगाव बसवंत येथील बॅंकांसमोर सोने तारण ठेवण्यासाठी व कर्ज नूतनीकरणासाठी गर्दी वाढू लागली आहे. दोन महिन्यांत पिंपळगावमधील बॅंकांमधून तीन कोटी रुपये सोने तारणावर वितरित झाले असून, आता बॅंकांकडे सुमारे 27 कोटी रुपयांचे सोने कर्ज स्वरूपात तिजोरीत आहे. 


 सोने तारणाकरीता गर्दी वाढली..

निफाड तालुक्‍यातील नगदी द्राक्ष पिकाची कोरोनामुळे धूळधाण झाली. यामुळे शेतकरी, सर्वसामान्यांनी घर खर्चासाठी आपल्याकडे असलेले सोने तारण ठेवण्यास सुरवात केली आहे. लॉकडाउनमध्ये ग्राहकांना सोने तारण कर्जाचे नूतनीकरणासाठी बॅंकांत येता न आल्याने लॉकडाउन शिथिल होताच आता बॅंकांमध्ये सोने तारणाकरीता गर्दी वाढू लागली आहे. 

लॉकडाउनचा फटका

 पिंपळगाव शहरात स्टेट बॅंकेसह गोल्ड लोन वितरित करणाऱ्या खासगी संस्था, पतसंस्थांकडे लॉकडाउनपूर्वी 24 कोटी रुपयांचे सोने तारण होते. त्यात आता तीन महिन्यांत तीन कोटींच्या सोन्याची त्यात भर पडली आहे. विशेषत: यामध्ये शेतकऱ्यांचे सोने अधिक आहे. द्राक्षपिकाचे उत्पन्न आल्यानंतर ते सोडविले जाते. यंदा कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनचा फटका द्राक्षाला बसला व दहा रुपये किलोपर्यंत द्राक्ष विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे उत्पन्न तर सोडाच, पण खर्चही निघाला नाही. त्यामुळे गहाण ठेवलेले सोने सोडविता आले नाही. याउलट दैनंदिन खर्च भागविण्यासाठी घरातील मणी मंगळसूत्र गहाण ठेवण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढावला आहे. एकीकडे बॅंकांसमोर सोने तारण ठेवण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे. 


हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट  

दुसरीकडे शहरातील सुवर्ण पेढ्यांमध्ये ग्राहकांची वानवा आहे. कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नागरिक लग्नसमारंभ थोडक्‍यात उरकत आहेत. लॉकडाउनमुळे सुवर्ण खरेदीचे तीन मुहूर्त टळले. लग्नसराईही गेली. लग्नाचे आता केवळ दोन मुहूर्त शिल्लक आहेत. लॉकडाउनमुळे सुवर्ण कारागीर गावी गेले आहेत. त्यामुळे नवीन सुवर्ण अलंकार घडविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीमुळे नागरिक सुवर्णालंकार मोडतील, असा अंदाज बाजारपेठेत व्यक्त करण्यात येत होता. मात्र, सध्या सुवर्णालंकार मोडण्यापेक्षा ते बॅंकांकडे तारण ठेवताना ग्राहक दिसून येत आहेत. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

लॉकडाउनमुळे उद्‌भवलेल्या स्थितीमुळे नागरिक सोने तारण ठेवण्यासाठी बॅंकेत येत आहेत. यात नवीन सुवर्ण तारण कर्ज व कर्जाचे नूतनीकरण करून घेणारे ग्राहक आहेत. मोठे दागिने अगोदरच गहाण असल्याने मंगळसूत्र तारण ठेवून शेतकरी आर्थिक निकड भागवत आहेत, अशी स्थिती कधीच नव्हती पाहिली. -राजेंद्र वाबळे, शाखा व्यवस्थापक, जनता सहकारी बॅंक, पिंपळगाव बसवंत