''कोरोना कळतो हो साहेब, पण या शेतमालाचं काय?''...शेतकऱ्यांची परिस्थितीशी झुंज सुरुच

farmer.jpg
farmer.jpg

नाशिक : (नगर) शेतीमालावर मोठा खर्च करून पिकविलेला माल फेकून देण्याइतके दुःख कोणतेच नाही. त्यामुळे नाईलाजाने का होईना हा माल विकल्या शिवाय पर्याय नाही. कोरोनाची भिती असली, तरी शेतकरी आपला माल घेऊन बाजार समितीत पाठवित आहे. आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज भागविण्यासाठी आणि शहरवासियांची भूक भागविण्यासाठी त्याची ही लढाई अनिवार्य आहे. कोरोनाचे सावट असले, तरीही तो लढतोच आहे. त्यामुळेच सर्व शहरांतील नागरिक चार भिंतीच्या आत झोपेत असतानाच हा बळीराजा बाजारात माल घेवून उभा ठाकतो आहे.

आता जगणे, जगविणे यालाच प्राधान्यक्रम

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला असल्याने माणसाला `जगणे` हाच प्राधान्यक्रम झाला आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
भारतात गेल्या महिनाभरापासून उपाययोजना सुरू करण्याचा भाग म्हणून बंद पाळण्यात येत आहे. रोज काही ना काही आदेश जिल्हाधिकारी देत आहेत. सर्व व्यवसाय बंद झाले असल्याने अनेकजण आर्थिक संकटात सापडले असले, तरी सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कारण शेतीमाल नाशवंत आहे. मोठा खर्च करून पिकविलेला माल विकण्याशिवाय पर्याय नाही.

जीवापुढे पैशाची किंमत झिरो

कोणतेही संकट आले तरी शेतकरी त्याच्या शेतात माल पिकवून स्वतःची भूक तर नक्कीच भागवू शकतो. किमान जगू शकतो. चैन, मौज, मजा,पर्यटन, शिक्षण आदींसाठी खर्चाला पैसा मिळाला नाही, तरी तो स्वतःच्या पोटाला लागेल तेवढे पिकवून स्वतःचे कुटुंब जगवू शकतो. परंतु, आपद्परिस्थितीत शहरवासियांना जगविण्याचे काम शेतकरीच करीत आहे. पैसा कितीही असला, तरी तो मरणाच्या वेळी बांधून थोडा घेता येतो. अशा आपद्परिस्थितीत या पैशाची किंमत झिरो झाल्याचे दिसून येते. इटलीसारख्या देशात तर हे प्रकर्षाने जाणवले. मग आठवतो तो जगण्याला आधार देणारा बळीराजा. जगणे यालाचा प्राधान्य देताना शेतकरी आणि शेतीशिवाय पर्याय नाही, हेच खरे.

उद्योगांचा तोटा अन शेतकऱ्यांचे नुकसान

उद्योग बंद झाले, तर उद्योगांना तोटा होतो, असे असले, तरी उत्पादनच बंद असल्याने खर्चही कमी होणार आहे. एखाद्या दिवशी नफाच नाही झाला म्हणजेच तोटो झाला, असे म्हणणे कितपत योग्य आहे. बॅंकेचे कर्ज, कर्मचाऱ्यांचा पगार, रोजचे मशिनचे डिप्रेशन असा खर्च धरला तरी उद्योग बंदच पडेल, अशी स्थिती येणार नाही. 
शिवाय या परिस्थितून बाहेर आल्यानंतर सरकार उद्योगांना उभारी येईल, असे काहीतरी निर्णय घेईल, असेच तज्ज्ञांचे मत आहे. परंतु शेतकऱ्यांचे मात्र उलटे आहे. 
सध्या शेतात उभ्या असलेल्या पिकांना लागवड व पिकविण्यासाठी नांगरणी, मशागत, औषधे, खतांवर मोठा खर्च झालेला आहे. विशेष म्हणजे हा खर्च आधीच केलेला आहे. 
त्यासाठी उसनवारी, कर्ज काढले आहे. 

मात्र केलेला खर्च काढण्याची त्याची भ्रांत

उत्पादित झालेला माल पुन्हा शेतात फेकून देण्याची वेळ येते. तेव्हा शेतकरी हतबल होतो. नफा तर नाहीच, परंतु खर्चही टळला नाही. शेतीमाल नाशिवंत आहे. पिके वाढणारच आहेत. आणि माल उत्पादित होणारच आहेत. तो एक तर विकावा लागेल किंवा फेकून द्यावा लागेल, अशीच स्थिती शेतकऱ्यांची होत असते. अशी स्थिती उद्योगांची नसते. कच्चा माल तसाच ठेवून तो नंतरही वापरता येणार आहे. कोरोनामुळे सर्व उद्योजक आपल्या बंगल्यात बसून राहतील. उपलब्ध असलेल्या पैशातून जीवनावश्यक माल  खरेदी करून जगेल. परंतु, शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळेच अशा कठीण परिस्थितीतही शेतकरी बाहेर पडत आहे. 
कोरोनाची मोठी भिती असतानाही तो शेतीमाल विक्री करीत आहे. त्याला नफा होणार नाही, मात्र केलेला खर्च काढण्याची त्याची भ्रांत आहे.

दूध व्यवसाय अडचणीत

रतिबाचे दूध घालताना शेतकऱ्यांना शहरात यावे लागत आहे. शहरातील परिस्थिती कोरोनाने भयभीत आहे. परंतु तरीही रोजच्या कुटुंबांना दूध घातल्याशिवाय त्याला पर्याय नाही. शहरवासियांना, त्यांच्या मुलांना दुध आवश्यकच आहे. आणि गायी, म्हशींचे दुध काढल्याशिवाय आणि ते मार्गी लावल्याशिवाय पर्यायही नाही. त्यामुळे दुध उत्पादकांचे दैनंदिनी बदललीच नाही. संचारबंदीच्या काळातही तो दूध विकत आहे. रोज पाच-पन्नास कुटुंबाला भेटत आहे. त्यांना स्वच्छ, निर्भेळ, जंतुविरहीत दूध देत आहे. दूध देताना तो स्वतःही काळजी घेत आहे आणि लोकांनाही दूध देताना काळजी घेतल्याचे आवर्जुन सांगत आहे. असे असले, तरी बहुतेक गावांत निर्णय घेवून दूध रतिबाला न घालता घरीच मार्गी लावण्याच्या सूचना येत आहेत. आपला जीव वाचवावा, अशाच काहीशा सूचना सरपंच तसेच आपले कुटुंबिय देत आहेत. त्यामुळे दुध व्यवसायिकांची मोठी अडचण होताना दिसत आहे. रोज गायी,म्हशींना जेवढे लागते तेवढा चारा, खुराक द्यावाच लागतो. तो खर्च सुरूच असतो. दुध मात्र घरीच ठेवण्याची वेळ आली तर बारा तासात ते नाशवंत होते. अशा कात्रीत तो अडकला आहे. त्यामुळे शहरवासियांना या दुधवाल्याला किमान सॅनिटाझरची एखादी बाटली देवून त्याला स्वतःची काळजी घेण्यासाठी मदत करायला हवी. त्याला आधार द्यायला हवा. कठिण परिस्थितीतही तो घरापर्यंत येतो व आपल्या लेकरा-बाळांची दुधाची गरज भागवितो, हे विसरून चालणार नाही.

शहरवासियांनो आभार माना त्यांचे 

वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी, पोलिस, जिल्हा प्रशासन, शासकीय अधिकारी आदी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार शहरवासियांनी टाळ्या वाजवून मानले. परंतु शहरांची भूक भागविणाऱ्या शेतकऱ्यांचेही तितकेच आदबीने आभार मानायला हवेत. कोरोनाचे सत्य-असत्य शहरवासिय सुज्ञ नागरिक म्हणून जाणतो. त्याचे गांभिर्याची वस्तुस्थितीही जाणतो. परंतु आडाणी असलेला शेतकरी मात्र पूर्ण घाबरलेला आहे. त्याला त्यामध्ये खूप खोलात जाता येत नाही, 
परंतु जगाच्या बातम्या ऐकून तो पुरता हाबकून गेला आहे. शहराकडे जायचे म्हटले की, की काटा येतो. आपली पत्नी, मुले वारंवार सांगतात जपून जा. घरच्या कर्त्याची  काळजी करीत आहेत. खूप मोठे संकट येऊन ठाकल्याचे त्यांना जाणवत आहे. त्यामुळेच शहरवासियांनो शेतकऱ्यांचे आभार माना. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो त्याच्या पद्धतीने भाजीपाला शहरात आणून देत आहे. दूधवाला सकाळीच न चुकता दूध देतो आहे. त्यालाही रोगाची लागऩ होण्याची भिती आहे. तरीही तो बाहेर पडतच आहे. स्वतःच्या आर्थिक परिस्थितीशी लढण्यासाठी आणि शहरवासियांची भूक भागविण्यासाठी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com