Fastag Update : फास्टॅग सक्तीचे! पिंपळगाव-बसवंत टोलनाक्यावर वाहन चालक व टोल कर्मचाऱ्यांत राडा

दीपक अहिरे
Tuesday, 16 February 2021

आज (ता.१६) नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव-बसवंत येथील टोलनाक्यावर वाहन चालक व टोल कर्मचाऱ्यांत राडा झाल्याचे समजते. तसेच वाहनांच्या दुतर्फा दोन किमी पर्यंत रांगादेखील लागल्या आहेत.

नाशिक : टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होण्यासाठी आजपासून (दि.१५) वाहनचालकांना ‘फास्टॅग’ (FASTag) बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील टोलप्लाझांवर याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आज (ता.१६) नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव-बसवंत येथील टोलनाक्यावर वाहन चालक व टोल कर्मचाऱ्यांत राडा झाल्याचे समजते. तसेच वाहनांच्या दुतर्फा दोन किमी पर्यंत रांगादेखील लागल्या आहेत.

महामार्गावरील सर्वाधिक महागडा टोलप्लाझा

तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर काल (ता. १५) मध्यरात्रीपासून फास्टॅग अंमलबजावणीला पिंपळगाव टोलप्लाझावर प्रारंभ झाला. दिवसभरात सुमारे १० हजार वाहने पिंपळगाव टोलप्लाझा ओलांडून गेली. त्यातील सुमारे ३ हजार वाहनांना फास्टॅग नव्हता. त्यांच्याकडून दुपटीने पथकर वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी आग्रह धरला. अगोदरच मुबंई-आग्रा महामार्गावरील सर्वाधिक महागडा टोलप्लाझा म्हणून पिंपळगावची ओळख आहे. त्यात फास्टॅग नसल्याने दुप्पट पथकर हा वाहन चालकांसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरला. 

कालही दिवसभर गोंधळ सुरू

वाहनचालक व कर्मचाऱ्यांमध्ये काल (ता.१५) दुप्पट पथकर वसुलीवरून शाब्दीक चकमकी उडाल्या. काही प्रकरणे तर हातघाईवर जाऊन राडा देखील झाला. वादाचे प्रसंग उद्‌भवणार, हे गृहित धरून पिंपळगाव टोलप्लाझा प्रशासनाने अतिरिक्त पोलीस बळ तैनात केले होते. वाद नको म्हणून काही वाहनचालक दुपटीचा पथकर देऊन पुढे जात होते. पण, अनेक जण तो देण्यास तयार नसल्याने धुमचक्री होत होती. पोलिसांच्या मध्यस्थीने हे वाद मिटविले जात होते. दिवसभर असा गोंधळ सुरू होता. त्यातून टोलप्लाझापासून एक किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कर्णकर्कश हॉर्नने टोलप्लाझावर एकच गोंधळ बघायला मिळाला. 

तर वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागेल...

वाहनांवर फास्टॅग नसूनही फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२१ पासून सर्व चार चाकींसह अन्य वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले आहे. परंतु ज्या वाहनचालकांकडून याची अंमलबजावणी होत नसेल, त्यांना थर्ड पार्टी इन्शुरन्स दिला जाणार नाही. एप्रिल २०२१ पासूनही त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार मंत्रालयाकडून होत आहे.

ही आहे. नियमावली 

* फास्टॅग मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो हवा

*  एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येणार असून बचत खात्याला लिंक करता येईल.

*  डेबिट-क्रेडिट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा

*  टोल नाक्यावरून जाताना वाहनचालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागेल.

फास्टॅग कुठून मिळेल?

एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय यासह २५ नामांकित बँकेच्या शाखांमधून किंवा ऑनलाइन फास्टॅग विकत घेता येतो. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवर, पेटीएम, अ‍ॅमेझॉन आणि माय फास्टॅग अ‍ॅपवरही सुविधा उपलब्ध आहे. तसेच, फास्टॅग बँकेत उपलब्ध असून तो २०० रुपयांना मिळतो. हा टॅग कमीत कमी १०० रुपयांपासूनही रिचार्ज करून मिळेल. ‘फास्टॅग’ खात्यातील टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाला त्यासंबंधीचा एक ‘एसएमएस’ त्यांच्या मोबाइलवर येईल. खात्यातील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. ‘फास्टॅग’ची मुदत पाच वर्षांची असेल. त्यानंतर नव्याने टॅग खरेदी करावे लागणार आहे. कार, जीप, व्हॅन आणि यांसारख्या वाहनांना ‘फोर’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवले जाणार आहेत. तर हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना ‘फाइव्ह’ क्लासचे, थ्री अ‍ॅक्सेल व्यावसायिक वाहनांना ‘सिक्स’ क्लासचे आणि बस आणि ट्रकना ‘सेव्हन’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fastag Update from pimplegaon baswant toll plaza nashik marathi news