#Lockdown : 'बिट्टी तयार होऊनही 'मका' शेतातच?'...मका उत्पादकांमध्ये नुकसानीची भीती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

खरिपात केलेल्या मका पिकाला लष्करी अळीने हैराण केल्यानंतर या परिसरातील काही शेतकऱ्यांनी स्वीट कॉर्न मकाला पसंती दिली. खते, औषधे आदींवर खर्च झाल्यानंतर आता मका बिट्टी काढणीयोग्य झाली. मात्र, कोरोनामुळे मजूर, व्यापारी मिळत नसल्याने स्वीटकॉर्न मका पीक संकटात सापडले आहे. 

नाशिक : (चिचोंडी) खरिपात केलेल्या मका पिकाला लष्करी अळीने हैराण केल्यानंतर या परिसरातील काही शेतकऱ्यांनी स्वीट कॉर्न मकाला पसंती दिली. खते, औषधे आदींवर खर्च झाल्यानंतर आता मका बिट्टी काढणीयोग्य झाली. मात्र, कोरोनामुळे मजूर, व्यापारी मिळत नसल्याने स्वीटकॉर्न मका पीक संकटात सापडले आहे. 

काढणीयोग्य मका पीक सध्या शेतातच उभा

पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या स्वीटकॉर्न मकाला सध्या कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे व देशच लॉकडाउन झाल्याने मका बिट्टी काढण्यापासून वाहतूक, व्यापारी असे मोठे संकट उभे आहे. काढणीयोग्य मका पीक सध्या शेतातच उभा आहे. कोरोना विषाणू येण्यापूर्वी पंधरा रुपये किलो, असा दर मिळत होता. त्यामुळे चांगला भाव मिळून खरिपात झालेले नुकसान भरून निघेल, या आशेवर शेतकरी होते. दुसरीकडे या मकाचा मुरघास करण्यासाठी कमी भाव असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. चिचोंडी खुर्द (ता. येवला) येथील भाऊसाहेब जाधव, अजित मढवई, समाधान मढवई, अंकुश शेजवळ, बाबासाहेब जाधव, अरुण जाधव या शेतकऱ्यांची काढणीयोग्य सहा एकर स्वीटकॉर्न मका शेतात उभा आहे. 

हेही वाचा > photos : लॉकडाउनमध्येही नाशिककर जपताहेत सामाजिक भान; रोज शंभर जणांकडून 'रक्‍तदान'

पर्यटकांची पर्यटनस्थळी स्वीटकॉर्न मकाला चांगली मागणी असते. मात्र, खरिपात मका पीक लष्करी अळीचे संकट व भावही नसल्याने उन्हाळ्यात निघेल या आशेवर मका पीक घेतले. मात्र, कोरोनामुळे दळणवळण ठप्प झाल्याने सध्या व्यापारी मजूर व मार्केटही सुरू नसल्याने खरेदीस नकार देत आहेत. - समाधान मढवई, शेतकरी 

हेही वाचा > #Lockdown : 'बाहेर निघू नका, पोलीस खेळताय खरोखरचा पब्जी!'...कामगिरीचं होतंय कौतुक

हातातोंडाशी आलेला स्वीटकॉर्न मका मार्केट उपलब्ध नसल्याने जनावरांना घालण्याची वेळ आली. झालेला खर्च निघणार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. - अजित मढवई, शेतकरी  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of loss of maize growers nashik marathi news