कसमादेत दरवळतोय मेथीच्या लाडुंचा सुगंध! रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पसंती 

सुरेश खैरनार
Friday, 27 November 2020

कोरोनाने सर्वच घटकांना फटका बसला. मात्र या आजाराने नागरिकांना स्वत:ची काळजी घेणे शिकविले. यामुळेच आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिक गेल्या आठ महिन्यांपासून विविध उपाययोजना करीत आहेत.

निमगाव (नाशिक) : कोरोनाने सर्वच घटकांना फटका बसला. मात्र या आजाराने नागरिकांना स्वत:ची काळजी घेणे शिकविले. यामुळेच आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिक गेल्या आठ महिन्यांपासून विविध उपाययोजना करीत आहेत. हिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यतेने नागरीक अधिकच सतर्क झाले आहेत. त्यादृष्टीने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तालुक्यासह कसमादेत मेथीच्या लाडुंचा सुगंध दरवळण्यास सुरवात झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेने लाडू बनविण्याच्या साहित्यातील निम्म्या वस्तुंचे भाव कमी झाले आहेत. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

कसमादे पट्ट्यात दरवर्षी हिवाळ्यात आरोग्यासाठी डिंक, मेथी, काजू, बदाम, गावराणी तूप याचे लाडु बनविण्याची परंपरा आहे. या वर्षी ती अधिक जोमाने जोपासली जात आहे. मेथीचे लाडू थोडे कडवट असले तरी शरीराला पोषक असतात. गहू, भरडा, गावरानी तूप, गूळ, साखर, डिंक, खारीक, खोबरे, बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड, चारोळी, किसमीस याचे मिश्रण करून लाडू तयार केले जातात. शहरात मॉल व मिठाईच्या दुकानात डिंक व मेथीचे तयार लाडू मिळत आहेत. हिवाळ्यात थंडीचा जोर वाढला की या गरम पदार्थांचे सेवन गोड लागते. कोरोनामुळे अनेकजण अडचणीत आहेत. असे असले तरी शरीरसंपदा अधिक सदृढ करण्यासाठी काहीसे खर्चीक असलेले लाडू बनविण्याचा बहुसंख्य कुटुंबियांचा कल आहे. 

लाडूसाठी लागणाऱ्या 
वस्तुंचे दर (किलोप्रमाणे) : 

पदाथाचे नाव. - सन २०१९ - सन २०२० 
मेथी - १०० - ९० 
खारीक - ३५० - २२० ते २७० 
खोबरे - १७० - १९५ 
गूळ - ४० ते ५० - ५० ते ६० 
डिंक - २३० - २८० 
बदाम - ८५० - ५७० 
काजू - १००० - ८२० 
पिस्ता - १३०० - १३५० 
अक्रोड - १४०० - १३०० 
चारोळी - १४०० - १३५० 
गावराणी तूप - ६०० - ५५० 
गहू भरडा - २७ - २१ 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

 

थंडीची चाहूल लागताच सुका मेवा विक्रीसाठी नियोजन करावे लागते. गेल्या वर्षाच्या तुलनेत सुका मेवाच्या भावात घट झाली आहे. भुसार मालाच्या किमती वाढल्या आहेत. लाडू बनविण्याच्या साहित्य खरेदीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. 
-महेंद्र बुरड, इंद्रतारा ग्रपू, निमगाव 

कोरीना महामारीमुळे शारीरिक प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मेथीचे लाडू अनेक महिला करीत आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे जास्तीचा काळ घरी असल्याने पाक कृतीत महिला पारंगत झाल्या आहेत. ग्रामीण भागातील जेष्ठ महिलांचा मेथीचे लाडू बनविण्यात हातखंडा आहे. 
- योगिता हिरे, गृहिणी निमगाव  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fenugreek laddu is being prepared at Ksamade to boost immunity nashik marathi news