जादा बिलाच्या रकमेचा परतावा न केल्याने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल 

विनोद बेदरकर
Friday, 2 October 2020

७९ रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांची बिले तपासून त्यात अधिकची रक्कम वजावट करून संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांच्या नातेवाइकांना परतावा करण्याच्या सूचना होत्या. बिले तपासताना त्यातील त्रुटी, पीपीई किटसह साहित्याचे दर, औषधांच्या किमती, स्पेशल डॉक्टरांची फी आदींची तपासणी करण्याच्या सूचना होत्या.

नाशिक : कोविड उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या चार रुग्णांना आकारण्यात आलेल्या जादा बिलाच्या तीन लाख ८० हजार रकमेचा परतावा न केल्याने अशोका मेडिकव्हर रुग्णालयाविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल 
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेक रुग्णांनी महापालिकेऐवजी खासगी रुग्णालयात धाव घेऊन उपचार घेतले; परंतु रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा दराने आकारणी झाल्याच्या तक्रारी दाखल होत असल्याने महापालिकेने बिले तपासणीसाठी १३२ लेखापरीक्षकांची नियुक्ती केली. ७९ रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांची बिले तपासून त्यात अधिकची रक्कम वजावट करून संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांच्या नातेवाइकांना परतावा करण्याच्या सूचना होत्या. बिले तपासताना त्यातील त्रुटी, पीपीई किटसह साहित्याचे दर, औषधांच्या किमती, स्पेशल डॉक्टरांची फी आदींची तपासणी करण्याच्या सूचना होत्या.

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

गुन्हा दाखल करण्याच्या सूचना

अशोका मेडिकव्हर रुग्णालयाबाबत चार रुग्णांनी तक्रारी केल्यानंतर बिले तपासण्यात आली. त्यात दिलीप आहेर यांना एक लाख २५ हजार ९१९ रुपये, सुरेश लुंकड यांना १६ हजार ९७९ रुपये, संजय कोरडे यांना ७७ हजार ९२०, तर शेख सलीम मोहम्मद यांना एक लाख ५९ हजार ६७० रुपये असे एकूण तीन लाख ८० हजार ४८८ रुपये अतिरिक्त बिल आकारण्यात आले होते. महापालिकेने रुग्णालय प्रशासनाला जादा बिलाचा परतावा देण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु दखल घेतली नाही. २५ सप्टेंबरला पुन्हा नोटीस बजावण्यात आल्यानंतरही जादा रकमेचा परतावा न दिल्याने अखेरीस आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेचे लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (ता. ३०) मुंबई नाका पोलिस ठाण्यामध्ये साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० व त्यातील विविध तरतुदींचा भंग केल्यामुळे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. सागर मोतीराम पालवे यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

>>> नाशिकच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पोलिसांकडून टाळाटाळ 
मुंबई नाका पोलिसांकडे महापालिकेचे अधिकारी तक्रार दाखल करण्यासाठी गेले त्या वेळी पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. अदखलपात्र गुन्हा नोंदविण्याची भूमिका घेतल्यानंतर सांताक्रूझ येथील एका रुग्णालयावर महापालिकेने दाखल केलेल्या गुन्ह्याचा दाखला देण्यात आला. त्यानंतर पोलिसांची भूमिका नरमली. त्यानंतर पोलिसांकडून माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे प्रकरण दाबले जात असल्याचे बोलले जात आहे. 

>>> नाशिकच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

रुग्णालय प्रशासन देणार उत्तर 
या संदर्भात रुग्णालयाचे सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. समीर तुळजापूरकर यांनी सांगितले, की रुग्णालय प्रशासनदेखील महापालिकेच्या कारवाईला कायदेशीर उत्तर देईल. अशोका मेडिकव्हर रुग्णालयात एक हजार २०० पेक्षा अधिक कोविड रुग्णांवर उपचार कण्यात आले. त्यात फक्त चार तक्रारी आल्याने त्यांच्याकडून जाणूनबुजून कारवाई होत असल्याचे स्पष्ट होते. महापालिकेकडून ज्या-ज्या वेळी विचारणा करण्यात आली, त्या वेळी उत्तर देण्यात आले. शासनाने कोविडसाठी दर निश्‍चित केले असून, त्यानुसारच दर आकारले जाणार आहेत. त्याव्यतिरिक्त अन्य गंभीर आजारांवर झालेल्या उपचार करण्यात आल्याचे डॉ. तुळजापूरकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against Ashoka Medicare Hospital for non-refund of extra bill nashik marathi news