सप्तशृंगगडावर मराठी चित्रपटाचे चित्रीकरण; शंभराहून अधिक स्थानिकांना रोजगाराची संधी

योगेश सोनवणे 
Sunday, 11 October 2020

कळवण तालुक्याला निसर्गाची साथ असल्यामुळे हा परिसर हिरवाईने नटतो. सप्तशृंगगड हिलस्टेशन असल्यामुळे चित्रपट, लघुचित्रपट तसेच मराठी गाण्यांच्या चित्रीकरणासाठी येथे कायम आकर्षण राहिले आहे.

नाशिक/दहीवड : सध्या कोरोनामुळे थांबलेले आर्थिक चक्र हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र कोरोनामुळे अनेकांच्या रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्याने अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लाग आहे. अशा परिस्थितीत सप्तशृंगगड (ता. कळवण) येथे ‘मजनू’ चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे परिसरातील शंभराहून अधिक नवोदित कलाकार तसेच कळवणसह आजूबाजूच्या व्यावसायिकांना थोडाफार रोजगार मिळणार आहे. 

नवोदित कलाकरांना नामी संधी

कळवण तालुक्याला निसर्गाची साथ असल्यामुळे हा परिसर हिरवाईने नटतो. सप्तशृंगगड हिलस्टेशन असल्यामुळे चित्रपट, लघुचित्रपट तसेच मराठी गाण्यांच्या चित्रीकरणासाठी येथे कायम आकर्षण राहिले आहे. सध्या याच हिरवाईने नटलेल्या कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा तसेच सप्तशृंगगड परिसरात ‘मजनू’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सुरू आहे. या चित्रपटात कळवण परिसरातील ५० नवोदित कलाकरांना काम करण्याची नामी संधी निर्मात्याने उपलब्ध करून दिल्याने कळवण तालुक्यातील अनेक युवक-युवतींना रोजगार मिळाला आहे. तसेच केटरर्स, लाँड्री व इतर व्यावसायिकांनाही लॉकडाउननंतर विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली आहे. आतापर्यंत चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी व कलाकारांसाठी ५० लाखांवर उलाढाल झाल्याचे चित्रपट निर्मात्याने सांगितले. 
या चित्रपटाची कथा सर्वांनाच भावणारी असून, काही दिवसांपासून या चित्रपटाचे चित्रीकरण कळवण तालुक्यातील निसर्गाचे कोंदण असलेल्या गडावर सुरू असल्याचे चित्रपटाचे लेखक, निर्माता गोवर्धन डोलताडे यांनी सांगितले. 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

 
तालुक्याची कन्या मुख्य भूमिकेत 

या चित्रपटात मुख्य अभिनेता रोहन पाटील तसेच ‘लागीर झालं जी’ फेम अभिनेता ‘अज्या’ म्हणजेच नितीश चव्हाण मुख्य भूमिकेत आहे, तर मुख्य अभिनेत्री म्हणून कळवण तालुक्यातील श्वेता अहिरे सर्वांना दिसणार आहे. यांसह सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, प्रणव रनावरे, भक्ती चव्हाण तसेच कळवण तालुक्यातील शंभराहून अधिक छोट्या-मोठ्या भूमिका सादर करण्यासाठी कलाकार या चित्रपटात विविध भूमिका निभावणार आहेत. 

तालुक्यातील सप्तशृंगगडावर ‘मजनू’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रीकरणासंबंधी निर्माता, दिग्दर्शक यांना सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरण्याबाबत सूचना, काळजी घेण्याचे सांगत आहोत. 
बी. ए. कापसे, तहसीलदार, कळवण 
 

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filming of a Marathi film on Saptashrunggad nashik marathi news