नगरसूलहून पहिली किसान रेल्वे गुवाहाटीला रवाना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स- टॉप टू टोटल’च्या अंतर्गत किसान रेलगाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक सवलत देण्याची घोषणा केली. 

नगरसूल (नाशिक) : रेल्वे प्रशासनातर्फे किसान रेल्वेने मालवाहतूक करण्याकरिता मालवाहतूक दरात ५० टक्के सूट देऊन शेतमाल वाहतूक करण्यासाठी सुविधा निर्माण केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे नेहमीच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी सतत करत असलेल्या प्रयत्नात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेने महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू

मंगळवारी (ता.५) दक्षिण मध्य रेल्वेने महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू केली. कांद्याने भरलेला प्रारंभिक रॅक नांदेड विभागातील नगरसूल ते गुवाहाटीपर्यंत सुरू झाला आहे. नांदेड विभागातील ही पहिली किसान रेल्वे सोडण्यात आली. शेतमाल विक्रीसाठी असलेल्या अडचणी, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स- टॉप टू टोटल’च्या अंतर्गत किसान रेलगाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक सवलत देण्याची घोषणा केली. 

गुरुवारी गुवाहाटी गुड्स कॉम्प्लेक्सवर पोचणार

त्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातील प्रथम किसान रेल्वेलाही कांद्याच्या वाहतुकीसाठी ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. नगरसूल स्थानकातून सायंकाळी २३ टन क्षमतेच्या २२ पार्सल व्हॅनसह कांदा घेऊन रवाना करण्यात आली. ही गाडी ५० तासांच्या अल्प कालावधीत अडीच हजार किलोमीटरचे अंतर पार करून सुमारे ५२२ टन कांदा घेऊन गुरुवारी (ता. ७) रात्री गुवाहाटी गुड्स कॉम्प्लेक्सवर पोचणार आहे.  

हेही वाचा > मैत्रीत मोठा घात! मित्राच्याच डोक्यात घातला मोठा दगड; नशेत सांगितली धक्कादायक आपबिती

नांदेड विभागातील रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगरसूल स्थानकातून किसान रेल सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले. शेतकरी व व्यापारी बांधवांनी रेल्वेच्या सुविधांचा लाभ घ्यावा. दक्षिण मध्य रेल्वेची मालवाहतूक वाढवण्यास हातभार लावावा. - गजानन माल्या, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे  

हेही वाचा >  डोळ्यासमोर काळ अन् गळ्याभोवती बांधलेल्या स्टोलमुळे वाचली तरुणी; अंगावर काटा आणणारी घटना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first kisan train left from Nagarsul nashik marathi news