दिलासादायक! पाच दिवसांनंतर पॉझिटिव्‍हपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक; ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्या तेवीसने घटली

अरुण मलाणी
Wednesday, 26 August 2020

दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५६६, ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २६१, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३१, डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालय-रुग्‍णालयात १२, तर जिल्‍हा रुग्‍णालयात सात संशयितांवर उपचार सुरू केले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ९५९ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते.

नाशिक : कोरोनावर मात करणाऱ्या रुग्‍णांपेक्षा नव्‍याने पॉझिटिव्ह अहवालांची संख्या अधिक येत असल्‍याने गेल्‍या काही दिवसांपासून ॲक्टिव्‍ह रुग्‍णांच्‍या संख्येत वाढ होत होती. परंतु, पाच दिवसांनंतर पुन्‍हा एकदा बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या पॉझिटिव्‍ह रुग्‍णांपेक्षा अधिक आली आहे. मंगळवारी (ता. २५) दिवसभरात ६२० कोरोनाबाधित आढळले, तर बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ६४३ असल्‍याने ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्या तेवीसने घटली आहे. 

ॲक्टिव्‍ह रुग्‍णांची संख्या तेवीसने घटली

मंगळवारी नाशिक शहरातील ४७०, ग्रामीण भागातील १४८, तर मालेगावच्‍या दोन रुग्‍णांसह एकूण ६२० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २६ हजार ७७४ झाली आहे. तसेच, बरे झालेल्‍या ६४३ रुग्‍णांमध्ये ग्रामीण भागातील २३३, नाशिक शहरातील ३८३ आणि मालेगावचे २७ रुग्ण आहेत. त्यामुळे बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या २४ हजार ६९८ झाली आहे. ॲक्टिव्‍ह रुग्‍णांची संख्या तेवीसने घटली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात चार हजार ९१८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यापूर्वी १९ ऑगस्‍टला ८६४ कोरोनाबाधित आढळलेले असताना, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या एक हजार १९७ इतकी होती. त्‍यानंतरचे पाच दिवस बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या सातत्याने कमी होती. 

दिवसभरात ६४३ रुग्‍णांची कोरोनावर मात 

दरम्‍यान, मंगळवारी जिल्ह्यात चौदा कोरोनाबाधितांचा उपचार सुरू असताना मृत्‍यू झाला. यात नाशिक शहरातील बारा तर, ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५६६, ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २६१, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३१, डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालय-रुग्‍णालयात १२, तर जिल्‍हा रुग्‍णालयात सात संशयितांवर उपचार सुरू केले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ९५९ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी एक हजार १८७ रुग्‍ण नाशिक ग्रामीणमधील आहेत. 

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

मालेगावमध्ये मृतांची संख्या चिंताजनक 

मालेगाव : शहर व तालुक्याला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येबाबत सलग दुसऱ्या दिवशी मोठा दिलासा मिळाला. मात्र, कोरोनाबाधित व संशयित रुग्णांच्या मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. मंगळवारी शहर व तालुक्यातील प्रत्येकी एक कोरोनाबाधित व तीन संशयित रुग्णांचा सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर दिवसभरात केवळ सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील तीन व टेहेेरे, दाभाडी, ढवळेश्‍वर, रावळगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, शहरातील कोरोनाबळींची संख्या १०७ झाली असून, तालुक्यात २३ जणांचा बळी गेला आहे. आज नव्याने ३१ रुग्ण दाखल झाले. २७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर नऊ रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले. शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १७२, तर ग्रामीण भागातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०७ आहे. अद्याप ५५१ अहवाल प्रलंबित आहेत.  

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five days later than corona positive The number of healed is higher nashik marathi news